डेक्कन क्वीन आणि पंचवटीमध्ये पुन्हा फिरत्या ग्रंथालयाला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ट्रेन प्रवासातही सोशल मीडिया आणि पबजी गेममध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना वाचन संस्कृतीकडे वळवण्यासाठी मुंबई-पुणे डेक्कन क्वीन व पंचवटी एक्स्प्रेसमध्ये पुन्हा फिरत्या ग्रंथालयाला सुरुवात होणार आहे.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडय़ाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी या दोन्ही एक्स्प्रेसमध्ये फिरते ग्रंथालय पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क साधला आहे. या फिरत्या ग्रंथालयाला रेल्वे मंत्रालयाने एक वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. प्रवाशांना वाचनाची गोडी लावण्याठी डेक्कन क्वीन व पंचवटी एक्स्प्रेसमध्ये फिरते ग्रंथालय सुरू करण्यात आले होते. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाचे प्रतिनिधी प्रवाशांना ही पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून देतात. ट्रेनचा प्रवास सुरू झाल्यावर प्रवाशांना ही पुस्तके वाचालया देतात आणि प्रवास संपल्यावर प्रवाशांनी ही पुस्तके पुन्हा जमा करायची आहेत.

वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी
या उपक्रमाला रेल्वे मंत्रालयाच्या वतीने मान्यता दिली जाते. ही परवानगी एक वर्षासाठी दिली जाते. मागील वेळेस दिलेली मुदत संपुष्टात आली होती. पण वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी संपर्क साधल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने या उपक्रमाला मुदत वाढवून दिली आहे.

मराठी पुस्तके कमी दरात
वाचन चळवळीला चालना देण्यासाठी मराठी भाषेतील लोकप्रिय पुस्तके वाचकांना स्वस्तः दरात कशी देता येतील याचा विचार सुरू असल्याचे सुभाष देसाई म्हणाले. मंत्रालय तसेच महामंडळांच्या कामकाजात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे अशी सूचना त्यांनी केली.