
खेड तालुक्यात निगडे-बोरज ग्रामपंचायतीच्या हद्दीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारी ठेकेदार कंपनी मोठ्या प्रमाणात बेकायदा गौण खनिज उत्खनन करत आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे खेड तालुका अध्यक्षगौस खतीब यांनी केला असून याबाबत महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रारकेली आहे.
या बाबतची सत्यता जाणून घेण्यासाठी विधानपरिषदेच्या आमदार हुस्नबानू खलिफे या आठवड्यात या परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहेत. खतीब यांनी महसुल मंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, निगडे-बोरज ग्रामपंचायतीच्या हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन सुरू आहे. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर निगडे-बोरज ग्रामपंचयायत कार्यालयात जाऊन चौकशी केली असता समोर आलेले सत्य विदारक आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरु असलेले उत्खनन महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारे ठेकेदार कंपनी करत आहे मात्र यासाठी ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे कोणत्याही प्रकारचा महसुल जमा केला जात नाही. उत्खननाला बंदी असलेल्या भागात एखाद्या शेतकऱ्यांने उत्खनन केले तर त्या शेतकन्यावर महसुल विभागाकडून कारवाई केली जाते. शासकीय नियमांनुसार दंड वसूल केला जातो मग या परिसरात विनापरवानगी उत्खनन सुरु असताना त्याबाबत महसूल खाते कोणतीच कारवाई का करत नाही. की संबधित कंपनीने स्थानिक महसूल यंत्रणेलाच खरेदी केले आहे ? याची चोकशी व्हावी अशी मागणी खतीब यांनी केली आहे.
ज्या परिसरात अवैध उत्खनन सुरु आहे त्याच परिसरात बोरज धरण आहे. या धरणातून खेड शहराला पाणी पुरवठा केला जातो. मार्च अखेर याच धरणात्ून खेड शहरातील जनता आपली तहान भागवत असते. मात्र सद्यस्थितीत याच परिसरात होत असलेल्या उत्खननामुळे धरणातील पाणी दुषीत होवू लागले आहे. हे दुषीत पाणीच खेड शहराला पुरविले जात असल्याने खेड शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुठभर लोकांच्या तुंबड्या भरून संबधित ठेकेदार खेड शहरातील जनतेच्या जिवाशी खेळत आहे मात्र याकडे महसुल यंत्रणेला लक्ष द्यायला वेळ नाही ही खेदजनक असल्याचे खतीब यांनी म्हटले आहे. या परिसरात असलेल्या अवैध खडीक्रेशरसाठी लागणारा दगड फोडण्यासाठी कॉरीमध्ये भुसुरुंगाचे स्फोट घडवून आणले जातात. ही कॉरी मानवी वस्तीपासून जवळच असल्याने काही ग्रामस्थांच्या घरांच्या भित्तीना तडे गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर संबधित ठेकेदाराकडून तक्रार करणाऱ्यांनाच धमकावले जाते त्यामुळे मनात असतानाही ग्रामस्थांना तक्रार करणे शक्य होत नाही.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारी ठेकेदार कंपनी शासकिय महसूल बुडवण्याबरोबरच नागरिकांच्या जीवाशी खेळून स्वत:चा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही खतीब यांनी दिला आहे

























































