कृषीविषयक योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविणार – कृषीमंत्री दादाजी भुसे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृषीविषयक धोरणे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर यशस्वीरित्या अंमलबजावणी होतील यासाठी विभागाने झोकून काम करावे. प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी मंगळवारी केले. कृषीमंत्री पदाचा कार्यभार भुसे यांनी मंगळवारी सकाळी मंत्रालयात स्वीकारला. यावेळी विभागाचा आढावा त्यांनी घेतला. कृषी आयुक्त, विभागप्रमुख, संचालक आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कृषीमंत्र्यांनी त्यांचे ‘व्हिजन’ स्पष्ट केले.

शेतकरी केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागाची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. आपण सारे शेतकरीपुत्र आहोत. याची जाणीव ठेवत शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. मंत्रालयात कृषीविषयक ध्येय धोरणे, योजना आखल्या जातात. त्या प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्याच्या बांधावर नेण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत. कृषी विभागातील योजनांचे संलग्नीकरण करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल या दृष्टीने योजना राबविल्या जातील, असेही भुसे यांनी यावेळी सांगितले. कृषी विभागातर्फे प्रगतीशील शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन राज्यभरातील शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले जाईल. त्यातून अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल, असेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.

जवानांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री आवास योजनेतून प्राधान्याने घरे द्यावी

राज्यातील माजी सैनिक आणि लष्करात कार्यरत असणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्यासाठी प्राधान्य द्यावे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. मंत्रालयात माजी सैनिक कल्याण विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर भुसे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह उपस्थित होत्या. भुसे म्हणाले, माजी सैनिक, लष्करातील जवानांच्या शौर्याप्रती, बलिदानाप्रती आदर व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक त्या सोयी पुरविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. माजी सैनिक किंवा प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या जवानांच्या कुटुंबियांना घर देण्याचा मानस भुसे यांनी यावेळी व्यक्त केला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात बसणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना घर देण्याबाबत प्राधान्य देण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

राज्यातील आजी-माजी सैनिकांच्या घरांना घरपट्टीतून सूट द्यावी यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार असून वित्त विभागाकडे या संदर्भात प्रस्ताव पाठवावा. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्र्यांशी या प्रकरणी चर्चा करु, असे भुसे यांनी यावेळी सांगितले. सैनिकाची पत्नी शासकीय सेवेत असेल तर त्यांना घराजवळ किंवा इच्छित ठिकाणी बदली देण्याचे धोरण तयार करावे, अशी सूचना देखील भुसे यांनी यावेळी केली.