राज्यातील जिल्हा रुग्णालयात केमोथेरेपी उपचार उपलब्ध होणार, आरोग्य मंत्र्यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्करोगाचे वाढते प्रमाण आणि उपचारांसाठी मोठ्या शहरात येण्यामध्ये रुग्णाचा वाया जाणारा वेळ, खर्च व त्रास कमी करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयात केमोथेरेपी उपचार सुरु करण्याची महत्वपूर्ण घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंर आरोग्य विभागाची आढावा बैठक बोलावली होती. यावेळी विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले. आरोग्य आयुक्त अनुपकुमार यादव, महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेचे सुधाकर शिंदे, राज्य कामगार विमा रुग्णालयाचे आयुक्त आप्पासाहेब धुळज, आरोग्य संचालक डॉ.साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील, डॉ. सतीश पवार आदी उपस्थित होते.

टाटा रुग्णालयाचे सहकार्य

राज्यात सध्या 11जिल्हा रुग्णालयामध्येच केमोथेरपीची सुविधा उपलब्ध आहे. पण रुग्णांना दिलासा देण्याकरिता सर्वच जिल्हा रुग्णालयामध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने आवश्यक त्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्याच्या सूचना विभागाला यावेळी देण्यात आल्या.

आरोग्य सेवेसाठी जादा निधी

महाराष्ट्रातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी मिशन मोडवर काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत आरोग्य विभागाला अधिकचा निधी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्यामुळे आरोग्य संस्थांची अर्धवट बांधकामे,पायाभूत सुविधा उपलब्ध होतील असे राजेश टोपे म्हणाले.

जीवनशैलीचे आजार 

बदलत्या जीवन शैलीमुळे रक्तदाब,मधुमेह,हृदयविकार यासारखे आजाराचे प्रमाण वाढत असून याविषयी नागरिकांमध्ये अधिक जाणीवजागृती करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.