महानगर टेलिफोन निगमच्या कर्मचार्‍यांना तीन महिन्यांपासून पगार नाही, कर्मचार्‍यांची तीव्र निदर्शने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या कर्मचार्‍यांना तब्बल तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. दैनंदिन खर्च, मुलांचे शिक्षण, विविध प्रकारची बिले कशी भागवायची. इतकेच नाही तर, जगायचे कसे असाच प्रश्न या कर्मचार्‍यांना पडलेला असून कर्मचार्‍यांचा तीन महिन्यांचा पगार लवकरात लवकर द्यावा अशी मागणी कर्मचारी तसेच विविध संघटनांनी केली आहे. या मागणीसाठी कर्मचार्‍यांनी मंगळवारी दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत तीव्र निदर्शने केली.

पगाराच्या मागणीसाठी महानगर टेलिफोन निगम कामगार संघ, महानगर टेलिफोन निगम ऑफिसर्स असोसिएशन आणि महानगर टेलिफोन निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महानगर टेलिफोन निगमच्या प्रभादेवी टेलिफोन हाऊसच्या प्रांगणात तीव्र निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने सार्वजनिक उपक्रमांबाबत अवलंबिलेले धोरणच आपल्या कंपनीच्या दुर्दशेला जबाबदार आहे. या धोरणामुळेच एमटीएनएलच्या शेअरची किंमत 159 वरून 9 रुपयांवर आली. आता 85 टक्के कर्मचार्‍यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्यानंतर शेअर्सची किंमत 50 पैशांनी वाढली आहे. म्हणजेच कंपनीला कर्मचारीच नकोत, असा आरोप कामगार संघाचे सरचिटणीस दिलीप जाधव यांनी केला. निदर्शनात स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस दिलीप साटम, खजिनदार मारुती साळुंखे, महानगर टेलिफोन निगम ऑफिसर्स असोसिएशनचे राघवन, विलास सावंत, कामगार संघाचे उपसरचिटणीस जयदत्त आसरोंडकर, रजनी वैती आदींनी सहभाग घेतला.