
निर्भया गँगरेप प्रकरणातील चार दोषींपैकी एकाने विनयकुमार शर्मा याने आपली फाशी टाळण्यासाठी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. त्याने कोर्टात क्युरेटीव्ह याचिका दाखल केली असून आपल्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती देण्याची विनंती न्यायालयाला केली. आता निर्भयाचा दुसरा दोषी मुकेश सिंह यानेही सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे.
या गँगरेप प्रकरणात मुकेश, विनय शर्मा, अक्षय सिंह आणि पवन गुप्ता या चार नराधमांना 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता फासावर लटकविण्यात येणार आहे. या डेथ वॉरंटनंतर विनयकुमार याने क्युरेटिव्ह याचिका दाखल करून निर्भया प्रकरणावेळी त्याचं वय फक्त 19 वर्षं असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधायचा प्रयत्न केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने बलात्कार आणि हत्येशी निगडीत 17 अन्य प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा बदलून जन्मठेपेत केली आहे, ज्यात अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे. त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीकडे पाहून शिक्षा कमी करण्याची विनंती केली आहे. त्याच्यानंतर आता मुकेश सिंह यानेही न्यायालयाकडे विनंती केली आहे.
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती सतीशकुमार अरोरा यांनी मंगळवारीच या चौघा दोषींचा ‘डेथ वॉरंट’ जारी केला आहे.फाशीच्या या निर्णयावर अंमलबजावणी झाल्यावर महिलांमध्ये कायद्यावरील विश्वास वाढायला मदत होईल, असे निर्भयाच्या आईने म्हटले आहे. शिक्षा देण्याची वेळ जसजशी जवळ येतेय तसतशा तिहार कारागृहातील हालचालींना वेग आला आहे. कारागृहाच्या प्रमुखांनी या फाशीसाठी प्रशिक्षित जल्लादाची मागणी उत्तर प्रदेश कारागृह प्रशासनाकडे केली आहे.


























































