
गेल्या वर्षी बारावी सायन्सचा निकाल तब्बल 3.25 टक्क्यांनी घसरला होता; पण फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेत सायन्स शाखेत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुण मिळविण्याची संधी आहे. सायन्स शाखेचा अभ्यासक्रम गेल्या वर्षीप्रमाणेच आहे, पण पेपर पॅटर्न आणि मूल्यमापन पद्धतीत बदल करण्यात आल्यामुळे फिजिक्स, केमिस्ट्री, गणित, बायोलॉजी हे विषय स्कोअरिंग झाले आहेत. त्यामुळे 2019च्या तुलनेत यंदा सायन्सचा निकाल हमखास वाढेल अशी शक्यता विषयतज्ञांनी व्यक्त केली आहे.
देशपातळीवर होणाऱ्या इंजिनीयरिंग आणि मेडिकल प्रवेशाच्या जेईई आणि नीट परीक्षेत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम व्हावी यासाठी गेल्या वर्षी सायन्सच्या पेपर पॅटर्न आणि मूल्यमापन पद्धतीत बदल करण्यात आला होता. मात्र या बदलामुळे विद्यार्थ्यांना फायदा होण्याऐवजी बहुसंख्य विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास झाले, तर काहींना जेईई, नीटमध्ये चांगले गुण मिळाले, पण बारावीमध्ये ‘पीसीएम’ किंवा ‘पीसीबी’ गटात किमान 50 टक्के गुणदेखील मिळविता आले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची जेईई, नीटची संधीदेखील हुकली. याचा परिणाम सायन्स शाखेच्या निकालावरही झाला. त्यामुळे यंदाच्या वर्षी बारावी सायन्स शाखेची परीक्षा अधिक सुलभ करण्यासाठी बोर्डाने पेपर पॅटर्न आणि गुणपद्धतीत बदल केले आहेत.
सायन्सचा पेपर पॅटर्न स्कोअरिंग झाला आहे असे म्हणता येणार नाही. गेल्या वर्षी राबविण्यात आलेला एनसीईआरटीचा पेपर पॅटर्न आणि मूल्यमापन पद्धत तसेच राज्य शिक्षण मंडळ मार्च 2018च्या परीक्षेपर्यंत राबवीत आलेली परीक्षा पद्धत यांचा मेळ यंदा घालण्यात आला आहे. त्यामुळे बारावीचे विद्यार्थी देशपातळीवरील नीट, जेईई परीक्षेतही चांगली कामगिरी करतील तसेच बारावीत किमान पात्रता गुण मिळविण्यातही त्यांना अडचण येणार नाही- डॉ. अशोक भोसले, सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
पीसीबी विषयांच्या प्रश्नपत्रिकेत बहुपर्यायी प्रश्नांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्याचबरोबर अनेक प्रश्नांना पर्यायी प्रश्नदेखील दिले आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिका नक्कीच स्कोअरिंग झाली आहे. याचा परिणाम म्हणजे, बारावीचा निकाल तर वाढेलच, पण विद्यार्थ्यांची वैयक्तिक गुणवत्तादेखील नक्कीच वाढेल- हेमंत शिंदे, फिजिक्स शिक्षक, मिठीबाई कॉलेज






























































