ठाण्यात छोटा राजनच्या वाढदिवसाचे बॅनर शुभेच्छुकांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुख्यात गुंड छोटा राजन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर आज चक्क ठाण्यात झळकले. सी. आर. सामाजिक संघटनेच्या वतीने मध्यरात्री गुपचूप लोकमान्यनगर, नौपाडा, कळवा, गडकरी रंगायतनबाहेर टीएमटीच्या बस थांब्यांवर आधारस्तंभ राजेंद्र सदाशिव निवाळजे ऊर्फ नाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असा मजकूर असलेले बॅनर अनधिकृतरीत्या लावल्याप्रकरणी ठाणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नौपाडा व कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या दिल्लीत तिहार कारागृहात पत्रकार जेडे यांच्या हत्याप्रकरणी छोटा राजन शिक्षा भोगत आहे. काही वर्षांपूर्वी त्याला हाँगकाँग येथून पकडून हिंदुस्थानात आणण्यात आले असून त्याच्या विरुद्ध सुरू असलेल्या बहुतांश प्रकरणात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला सुनावणीसाठी हजर केले जाते.

चौकशी सुरू 

बॅनरवर सी. आर. सामाजिक संघटनेचा ठाणे शहर अध्यक्ष प्रकाश भालचंद्र शेलटकर याचे शुभेच्छुक म्हणून तर ठाणे शहर महिला अध्यक्षा संगीता शिंदे, मुंबई शहर अध्यक्ष राजा गोळे, संस्थापक, अध्यक्ष म्हणून हेमचंद्र मोरे या तिघांचे फोटो आहेत. या चौघांचे छोटा राजनसोबत नेमके काय संबंध आहेत, याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.