बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नाही, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाम वगळता देशात अन्यत्र राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) लागू करण्याची आवश्यकता नाही असे माझे स्पष्ट मत आहे. असे सांगत बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नाही, असे स्पष्टीकरण आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले. राष्ट्रीय जनता दलाने विधानसभेबाहेर एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) संतप्त निदर्शने केली, त्यानंतर नितीश यांनी वरील उत्तर दिले.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत स्पष्टपणे सांगितले की, बिहारमध्ये हे दोन्ही कायदे लागू करण्यात येणार नाहीत. राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते आणि आमदार भाई वीरेंद्र यादव यांच्यासह अन्य आमदारांनी विधानसभेबाहेर जोरदार आंदोलन केले. या सर्व आमदारांच्या हातात एनआरसी आणि सीएएविरोधातील पोस्टर्स होती. भाजप संविधानाला संपवीत आहे. त्यामुळे आम्ही बिहारमध्ये सीएए-एनआरसीला लागू होऊ देणार नाही, असे आंदोलनकर्त्या आमदारांनी ठणकावले आहे.

आमदारांच्या आंदोलनानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत यावर स्पष्टीकरण दिले. नितीश म्हणाले, बिहारमध्ये एनआरसी लागू करण्याचा प्रश्नच येत नाही. हे केवळ आसामसंदर्भातील मुद्दा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे हे बिहारमध्ये लागू होणार नाही.

प्रशांत किशोर यांचे ट्विट आणि नितीश यांच्या भूमिकेनंतर केंद्राकडे लक्ष
बिहार विधानसभेने डिसेंबर 2019 मध्ये संसदेत मंजूर करण्यात आलेल्या 126 व्या संविधान संशोधन (अनुसूचित जनजाती आरक्षण विस्तारासाठी) ला स्वीकार करण्याला मंजुरी दिली आहे. दरम्यान, जेडीयूचे उपाध्यक्ष असलेल्या प्रशांत किशोर यांनी रविवारी यासंबंधी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, बिहारमध्ये नागरिकत्व आणि एनआरसी हे केंद्र सरकारचे दोन्ही कायदे लागू होणार नाहीत. त्यांच्या या ट्विटनंतर आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नितीश कुमारांच्या या भूमिकेनंतर केंद्र सरकार काय भूमिका घेतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.