
ईशान्येकडील जनतेने नागरिकत्व कायद्याबाबत चिंता करू नये. येथे कुणाही अल्पसंख्याकाचे नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. काही संघटना या कायद्याबाबत गैरसमज पसरवत आहेत हे लक्षात घ्यावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता डॉ. संबित पात्रा यांनी केले.
सीएए कायद्याबाबत जनजागृतीसाठी माय होम इंडियाच्या वतीने नवी दिल्लीत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होते. फाळणीप्रसंगी पाकिस्तानातून आलेल्या शीख तसेच हिंदूंना नागरिकत्व देण्याचे आश्वासन महात्मा गांधी यांनी दिले होते याकडेही पात्रा यांनी लक्ष वेधले, तर सीएए कायद्याबाबत अजिबात गोंधळून जाऊ नये असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केले. मोदी यांनी ईशान्येकडील जनतेबाबत धोरण तयार केले आहे. त्यानुसार ईशान्येच्या दृष्टीने ठोस पावले उचलली जातील असेही देवधर यांनी सांगितले. या चर्चासत्राला ईशान्येकडील 500 हून अधिक तरुण आणि विद्यार्थी उपस्थित होते. याशिवाय खासदार महेश शर्मासुभारती विद्यापीठाचे अध्यक्ष संस्थापक डॉ. अतुल कृष्णा आणि माय होम इंडियाचे व्यवस्थापकीय विश्वस्थ विनय पांडे यांचीही उपस्थिती होती.























































