आदित्य ठाकरे यांनी घेतली राहुल गांधी, जयराम रमेश यांची भेट, शिक्षण, पर्यावरण विषयावर केली सविस्तर चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीत या नेत्यांमध्ये शिक्षण आणि पर्यावरणाबरोबरच विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

aaditya-face-book

अदित्य यांनी आज सकाळी राहुल गांधी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत राज्यातील शिक्षणाच्या क्षेत्रात करावयाचे बदल तसेच प्लास्टिक बंदी यासह विविध राष्ट्रीय विषयांवरही या युवा नेत्यांमध्ये विस्तृत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच दोघांनी एकमेकांना तिळगुळ देऊन मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी शिवसेनेच्या उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी याही उपस्थित होत्या. या भेटीनंतर आदित्य यांनी माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांची भेट घेऊन पर्यावरणविषयक समस्यांबद्दल चर्चा केली. तत्पूर्वी आदित्य यांनी काँग्रेस नेते अहमद पटेल यांचीही सदिच्छा भेट घेतली.

फेसबुक, इन्स्टाग्रामच्या मुख्यालयाला भेटी
आदित्य ठाकरे यांनी फेसबुक आणि इन्स्ट्राग्रामच्या मुख्यालयाला मंगळवारी भेटी दिल्या. लोकोपयोगी सरकारी योजना तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी या आधुनिक माध्यमांची मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी या वेळी बोलून दाखवला. तत्पूर्वी आदित्य ठाकरे यांनी वायू प्रदूषणावर झालेल्या चर्चासत्रात भाग घेतला. या चर्चासत्रात आदित्य ठाकरे यांच्यासह भुतानचे माजी पंतप्रधान श्रेरिंग टोबगे, न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान हेलेन क्लार्क, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर व पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन.के. सिंग हे मान्यवरही सहभागी झाले होते.