बँकांच्या 15 हजार नव्या शाखा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिक मंदी, घोटाळे आणि बुडीत कर्जांमुळे बँकिंग क्षेत्र अडचणीत आल्याची स्थिती एकीकडे असली तरी दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात बँकिंगचे जाळे कमी आहे. त्यामुळे या वर्षात देशभरात बँकांच्या 15 हजार नव्या शाखा सुरू होण्याची शक्यता आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात या शाखा सुरू कराव्यात असे निर्देश केंद्र सरकारने बँकांना दिले आहेत. स्टेट बँक (एसबीआय), बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय या बँका 15 हजार शाखा सुरू करतील. यात सरकारी एसबीआयसारख्या मोठय़ा बँकेच्या 1500 पर्यंत नवीन शाखा असतील. खासगी बँकांच्या 600 ते 700 शाखा सुरू करतील अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. बँकिंग सेवा ज्या दुर्गम आणि ग्रामीण भागात पोहचलेली नाही अशा ठिकाणी नवीन शाखा असतील. गावाच्या 15 कि.मी. परिघाच्या आत बँक असावी असे केंद्र सरकारचे निर्देश आहेत.

ग्रामीण भागात आहेत केवळ 35649 बँक शाखा
मार्च 2019 पर्यंत देशभरात बँकांच्या 1,20,000 बँक शाखा असून यातील 35,649 शाखा ग्रामीण भागात आहेत. केवळ एकतृतीयांश बँकांचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहचले आहे. रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार बँकिंग सेवा तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामीण भागात 5 लाख 50 हजार शाखांची गरज आहे. दरम्यान, देशभरात 2 लाख एटीएम आहेत.