
पाथरीच्या विकासासाठी सरकारने जरूर निधी द्यावा; परंतु हा निधी साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून तेथे विकास आराखडा राबवण्यासाठी देऊ नये किंवा तशी ओळख निर्माण केली जाऊ नये असे म्हणत रविवारपासून साईबाबांची शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय शिर्डीकरांनी घेतला आहे. आज शुक्रवारी शिर्डी ग्रामस्थांच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शनिवारी शिर्डीत ग्रामसभाही घेण्यात येणार आहे.
शिर्डीत येणाऱया भाविकांचे हाल होऊ नयेत यासाठी दोन दिवस आधीच शिर्डी बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शिर्डीच्या इतिहासात पहिल्यांदाच शिर्डी अशाप्रकारे बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडय़ातील पाथरी येथील साईजन्म स्थळासाठी 100 कोटींचा विकास आराखडा राबवण्यात येईल, अशी घोषणा गेल्या आठवडय़ात केली होती. त्याची प्रतिक्रिया भाविकांमध्ये उमटली. पाथरीला निधी देण्यास शिर्डीकरांचा मुळीच विरोध नाही; परंतु साई जन्मस्थान म्हणून त्याची ओळख निर्माण केली जात आहे त्याला आक्षेप असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. शिर्डी बंदबाबत झालेल्या बैठकीला नगराध्यक्ष अर्चना कोते, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, विजय कोते, मंगेश त्रिभुवन, अभय शेळके, शिवाजी गोंदकर, सुजित गोंदकर, दत्ता कोते, रवींद्र गोंदकर, रमेश गोंदकर, तुकाराम गोंदकर, सुनील गोंदकर, दिनकर कोते, सुधाकर शिंदे, विजय जगताप, गनीभाऊ जमादार, दीपक वारुळे, शफीक शेख, तान्हाजी गोंदकर आदि उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांना भेटून वस्तुस्थिती सांगणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः साईभक्त आहेत. त्यांना चुकीची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पाथरीचा साईजन्मस्थान असा उल्लेख झाला असावा. यापूर्वीही राष्ट्रपतींनी साई समाधी शताब्दीत पाथरीचा उल्लेख केला होता. त्यावर शिर्डीकरांनी थेट दिल्लीत जाऊन त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडली होती. यावेळीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगणार असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
साईंच्या जन्मस्थळाचा कोणताही पुरावा नाही
काही लोकांनी साईबाबांना विशिष्ट धर्मात अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. साईबाबांनी आयुष्यभर फकिराच्या वेषात राहून दीनदुबळय़ांची सेवा केली. जगाला सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. आपला धर्म, पंथ,जन्म याबाबत कोठेही त्यांनी वाच्यता केली नाही. त्यांच्या जीवनकार्याबद्दल साईचरित्र हा एकमेव दस्तऐवज असून त्यात कोठेही साईंच्या जन्मस्थळाचा किंवा ते कोणत्या धर्माचे होते याबाबतचा उल्लेख नाही. असे असताना पाथरी येथील काही मंडळी बाबांना विशिष्ट जातीचे असल्याचा दावा करून साईभक्तांच्या आणि साईबाबांच्या विचारधारेला नख लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांचा आहे.
नेमके काय म्हणणे आहे शिर्डीकरांचे…
साईबाबांनी आपले नाव, गाव, जात, धर्म कधीही सांगितला नाही. त्यामुळे जगभर सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ते ओळखले जातात. यापूर्वीही साईबाबा आणि त्यांच्या आईवडिलांविषयी अनेक बोगस दावे करण्यात आले असून जन्मस्थळाच्या या दाव्याने बाबांवर एका जातीचे, धर्माचे लेबल लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. यामुळे बाबांच्या मूळ शिकवणुकीला आणि त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल. त्यामुळे साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून पाथरीचा विकास करण्यास त्यांचा विरोध आहे.



























































