झाडांच्या पुनर्रोपणासाठी ठाण्यातच भूखंड शोधा, मेट्रो-4 प्रकरणी हायकोर्टाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे मेट्रो-4 प्रकल्पाला अडथळा ठरणारी झाडे एमएमआरडीएमार्फत तोडण्यात येणार असून काही झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. पुनर्रोपित करण्यात येणारी झाडे ही ठाणे शहराबाहेर लावली जाणार असल्याने त्याचा परिणाम येथील पर्यावरणावर होणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने पुनर्रोपित करण्यात येणार्‍या झाडांसाठी ठाण्यातील आरक्षित भूखंड शोधावेत असे आदेश न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने प्रशासनाला दिले.

माजीवडा, कापूरबावडी, कासारवडवली येथील 913 झाडे पुनर्रोपित करण्यात येणार असून पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने त्यास मंजुरी दिली आहे, परंतु ती झाडे मातीतील गुणधर्माअभावी जगण्याची शक्यता फारच कमी आहे. ही झाडे 30 कि. मी. परिघाच्या आतच लावण्यात येणार आहेत. त्यावर याचिककर्त्यांच्या वतीने ऍड. मिनी मॅथ्यू आणि ऍड. अंकित कुलकर्णी यांनी कोर्टाला सांगितले की, सदर झाडे ही दुसर्‍या ठिकाणी लावल्यास ती जगू शकतील. खंडपीठाने हा युक्तिवाद ऐकून घेत प्रशासनाला झाडे पुनर्रोपित करण्यासाठी दुसरी जागा शोधण्याचे आदेश दिले व सुनावणी तहकूब केली. ठाण्यातील पर्यावरणवादी रोहित जोशी यांनी तसेच ठाणे नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने  जनहित याचिका दाखल केली होती.