
माझे वडील 1965 च्या लढाईत पाकिस्तानकडून एक फायटर पायलट म्हणून लढले होते. मायदेशासाठी कर्तव्य बजावल्यामुळे त्यावेळी त्यांना पुरस्कारही मिळाला. त्यांना मिळालेल्या पुरस्काराशी माझा काही संबंध नाही, त्याचप्रमाणे मला जाहीर झालेल्या ‘पद्मश्री’ पुरस्काराशीदेखील त्यांचा काही संबंध नाही, अशा शब्दांत गायक-संगीतकार अदनान सामी याने टीकाकारांना सुनावले. वडिलांच्या कामासाठी मुलाला दोषी धरणे चूक असल्याचेही तो पुढे म्हणाला.
अदनान हा पाकिस्तानातील वायुसेनेच्या अधिकाऱ्याचा मुलगा असल्याने काही राजकीय पक्षांनी त्याच्या विरोधात टीकेची झोड उठवली होती. मूळचा पाकिस्तानी असलेल्या अदनानला चारच वर्षांपूर्वी हिंदुस्थानचे नागरिकत्व मिळाले आहे. इतक्या कमी वेळेत त्याला ‘पद्मश्री’ पुरस्कार कसा जाहीर झाला, असा सवालही उपस्थित केला जात होता. अखेर याप्रकरणी अदनानने चुप्पी तोडली आहे. मी कलाकार आहे. मला राजकारणाशी काही घेणे-देणे नाही. परंतु उगाचच काही लोक आपल्या स्वार्थासाठी मला या वादात ओढत आहेत अशी खंतही त्याने व्यक्त केली. आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्याने केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. मला ट्रोल करणाऱयांना माझ्या लेखी काही महत्त्व नसल्याचेही अदनानने म्हटले आहे.





























































