‘सीएए’ कायदा बनवून सरकारने गांधीजींची इच्छा पूर्ण केली, राष्ट्रपतींच्या विधानावरून संसदेत काँग्रेसचा गदारोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kovind-in-session

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) बनवून राष्ट्रपिता महात्मा गांधींची इच्छा पूर्ण केली, या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने आज संसद डोक्यावर घेतली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रपतींचे अभिभाषण झाले. सीएएचा संबंध राष्ट्रपतींनी गांधीजींशी लावताच काँग्रेस खासदारांनी प्रचंड गोंधळ घातला.

राष्ट्रपती कोविंद यांनी सीएएबाबत बोलताना फाळणीनंतर गांधीजी काय म्हणाले होते त्याचीही आठवण करून दिली. ‘‘फाळणीनंतर निर्माण झालेली परिस्थिती पाहून गांधीजी म्हणाले होते की, पाकिस्तानातील हिंदू आणि शिखांना तिथे राहण्याची इच्छा नसेल तर ते हिंदुस्थानात येऊ शकतात. त्यांना इथे सामान्य जीवन उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. राष्ट्रीय नेते आणि पक्षांनी गांधीजींचे विचार नेहमीच पुढे नेले आहेत. आपल्या राष्ट्राची निर्मिती करणाऱयांच्या इच्छेचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे,’’ असे राष्ट्रपती कोविंद म्हणाले. सीएएबाबतच्या राष्ट्रपतींच्या विधानावर काँग्रेस खासदारांनी गदारोळ घातला. त्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. ‘भारत बचाओ’, ‘संविधान बचाओ’, ‘सीएए नही चाहिए’ अशा घोषणाही त्यांनी दिल्या.

कलम-370 हटवणे ऐतिहासिक
जम्मू-कश्मीरमधील कलम-370 हटवणे हा सरकारचा ऐतिहासिक निर्णय होता, असे राष्ट्रपती कोविंद म्हणाले. आता जम्मू-कश्मीरमधील नागरिक विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील आणि तेथील प्रत्येक व्यक्तीला त्याचे मूलभूत अधिकार मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जम्मू-कश्मीर आणि लडाखचा विकास हे माझ्या सरकारचे प्राधान्य असून तिथे शिक्षण संस्था उभारणे, आरोग्य सुविधा निर्माण करणे, पर्यटनाच्या योजना राबवणे ही कामे वेगाने सुरू आहेत, असे राष्ट्रपती म्हणाले.

z राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात ‘माझे सरकार’ या शब्दाचा तब्बल 58 वेळा उल्लेख केला. त्याशिवाय ‘माननीय सदस्यगण’ शब्द 54, ‘कायदा’ शब्द 14, ‘कश्मीर’ 12 आणि ‘लोकशाही’ या शब्दाचा चार वेळा उल्लेख केला.