
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशातील युवकांना नवीन ऊर्जा देईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या नवीन सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल, अशा शब्दांत मोदी यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. अर्थसंकल्पात देशातील प्रत्येक नागरिकासाठी तरतूदी करण्यात आल्याने नागरिक आर्थिकदृष्टया सक्षम होतील व या दशकात अर्थव्यवस्थेचा पाया अधिक भक्कम होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी सरकारकडून अर्थसंकल्पात अनेक उपायोजना करण्यात आल्या आहेत. शेती, इन्फ्रास्ट्रक्चर, टेक्सटाइल आणि टेक्नोलॉजी ही रोजगार निर्मितीची प्रमुख क्षेत्रे आहेत. रोजगार वाढवण्यासाठी या चार क्षेत्रांवर अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आल्याचे मोदींनी सांगितले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी 16 कलमी योजना बनवण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना मिळेल असे ते म्हणाले. मत्स्य प्रक्रिया आणि मार्केटिंगमध्ये युवकांना नव्या संधी मिळतील. बजेटमधून देशातील युवकांना नवीन ऊर्जा मिळेल असेही मोदी म्हणाले. निर्यात आणि एमएसएमई क्षेत्रातून रोजगार निर्मिती होते. निर्यात वाढवण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत असे मोदींनी सांगितले.
या अर्थसंकल्पात व्हिजन आणि अॅक्शन दोन्ही असून देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही मोदी म्हणाले. या अर्थसंकल्पातून मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्सच्या आश्वासनाला अधिक बळकटी देण्यात आली आहे, असे मोदी यांनी सांगितले. तरुणांना नव्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच ग्रामीण रोजगार क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे कामही अर्थसंकल्पातून करण्यात आले आहे. अर्थसंकल्पात सूचवलेल्या बदलांद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल, असे ते म्हणाले. हा अर्थसंकल्प सद्यपरिस्थितील गरजांची पूर्तता करतानाच भविष्यातील अपेक्षाही पूर्ण करणारा आहे. या अर्थसंकल्पातून उत्पन्न आणि गुंतवणुकीसह मागणी-पुरवठ्यावरही जोर देण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.




























































