वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, घाटकोपर, कुर्लामधील पाणीपुरवठा सुरळीत, रहिवाशांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेरावली जलाशयाच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम शनिवारी रात्री उशिरा पूर्ण झाल्याने वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, घाटकोपर, कुर्लामध्ये आज पाणीपुरवठा सुरळीत झाला. मेट्रो-6च्या पायलिंगचे काम सुरू असताना जलाशयाला जोडणारी 1800 मिमी व्यासाची पाईपलाईन फुटल्याने पाच भागांमधील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. रविवारी पहाटेपासून पाणीपुरवठा पूर्ववत झाल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील येथे हिल क्रिस्ट इमारतीजवळ मेट्रो–6 च्या पायलिंगचे काम सुरू असताना वेरावली जलाशयाची जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा खंडित झाला होता. महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. पाच विभागातील रहिवाशांची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये म्हणून वांद्रे (पश्चिम) येथे भाभा रुग्णालय, सांताक्रुझ (पूर्व) येथे वाकोला गावदेवी टनेल, वाकोला आणि मालाड (पश्चिम) येथे लिबर्टी गार्डन या ठिकाणी पाण्याचे टँकर विनाशुल्क भरण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा, असे निर्देश पालिका प्रशासनाला दिले हेते.

पाणीपुरवठा खंडित असलेल्या परिसरात सर्व मिळून टँकरच्या 473 फेऱयांमुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला. जलवाहिनी फुटल्यानंतर पालिकेच्या जलखात्याने युद्धपातळीवर काम सुरू करत शनिवारी रात्री आठच्या सुमाराला दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. यामुळे वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, घाटकोपर (पश्चिम), कुर्ला (पश्चिम) या सर्व भागांतील पाणीपुरवठा पहाटेपासून सुरळीत सुरू झाला, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.

मेट्रोच्या कामाचा ताप
मुंबईत ठिकठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. मात्र, ही कामे दिवस-रात्र सुरू असल्यामुळे सततचा आवाज, वाहतूककोंडी याबरोबर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडू लागले आहेत. या आधी मेट्रोचे काम सुरू असताना जलवाहिनी फुटून लाखो लीटर पाणी वाया गेले होते. मात्र, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील पालिकेची जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेलेच पण त्याचबरोबर पाच भागांतील पाणीपुरवठाही विस्कळीत झाला होता.