
एका समुद्र किनाऱ्यावर आलेलं एक गूढ, भग्न जहाज. त्यावरचं भीतीदायक वातावरण आणि रहस्यमय घटनांची एक मालिका… हे वर्णन तुम्हाला नक्कीच भीती आणि तितकीच उत्कंठा वाढवणारं वाटत असेल ना? तर हो.. असं जहाज खरोखर आहे. पण, प्रत्यक्षात नव्हे तर आगामी चित्रपटात.
विकी कौशल अभिनित ‘भूत पार्ट: वन- द हॉन्टेड शिप’ या चित्रपटाचा ट्रेलर एका भग्न, एकाकी आणि झपाटलेल्या जहाजाची गोष्ट सांगताना दिसत आहे. एक निर्मनुष्य जहाज अचानक एका किनाऱ्यावर येऊन ठेपतं आणि त्याच्याविषयी शोध करायला जाणाऱ्यांच्या विचित्र आणि भीतीदायक अनुभव या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहेत. एकंदरच चित्रपटाचा अनुभव खूपच थरारक आणि घाबरवणारा असेल, असं वाटत आहे.
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली असून या चित्रपटात विकीसह भूमी पेडणेकरही झळकणार आहे. चित्रपटाची कथा अद्याप गुलदस्त्यात आहे. शशांक खेतान दिग्दर्शित ‘भूत: पार्ट वन- द हॉन्टेड शिप’ हा चित्रपट येत्या 21 फेब्रुवारी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.


























































