
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दै. सामना’मधून सोमवारी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी खालच्या पातळीवर वक्तव्य केले. त्यामुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आमदार आशिष शेलार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले आणि त्याच्या पुतळ्याला शेण फासले.
‘हमसे जो टकराएगा, मिट्टी में जाएगा’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विजय असो’, ‘आशिष शेलारचे झाले काय, खाली मुंडके वर पाय’, ‘मुर्दाबाद मुर्दाबाद आशिष शेलार मुर्दाबाद’, या घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यानंतर महिला आघाडीच्या वतीने आशिष शेलारच्या पुतळ्याला शेण लावण्यात आल़. त्यानंतर शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत पुतळ्याचे दहन केले. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंदराव पाटील बोंढारकर, आमदार बालाजी कल्याणकर, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार यांनी आशिष शेलार यांनी नांदेडमध्ये पाय ठेवून दाखवावे, त्यांच्या तोंडात शेण घालून त्यांचा निषेध करू, असा इशारा यावेळी दिला.
या आंदोलनात आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंदराव पाटील बोंढारकर, उमेश मुंढे, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, महानगरप्रमुख अशोक पाटील उमरेकर, शहरप्रमुख तुलजेश यादव, निवृत्ती जिंकलवाड, उपजिल्हाप्रमुख नेताजी भोसले, तालुकाप्रमुख जयवंत कदम, तालुकाप्रमुख आकाश रेड्डी, महिला आघाडीच्या निकिता चव्हाण, निकिता शहापूरवाड, दीपाली उदावंत, सरिता बैस यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

































































