
>> रवींद्र मालुसरे ([email protected])
‘‘शिवरायांचा सिंह पडला समरांगणी, मराठा गडी यशाचा धनी’’ असा गौरव शिवछत्रपतींच्या ज्या सुभेदाराचा झाला आहे त्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा महाराष्ट्राला आणि मराठी मनाला सतत स्फूर्तिदायी ठरली आहे. नरवीर तानाजींनी भावनेपेक्षा आणि कुटुंबाच्या कर्तव्यापेक्षा स्वराज्याची हाक ऐकली आणि स्वतःचे प्राण अर्पण केले. आजच्या (4 फेब्रुवारी) सिंहगड महापराक्रम शौर्यदिनाच्या निमित्ताने नरवीर तानाजी आणि सूर्याजी मालुसरे या पराक्रमी बंधूंच्या महान कार्याचे सिंहावलोकन करणे कर्तव्यच ठरेल.
नरवीर तानाजी मालुसरे क्षात्रकुलोत्पन्न ‘मल्ल’ राजवंशीय कुळातील होते. अकराव्या शतकातील आपत्काळात ‘मल्ल’ घराण्यातील एक शाखा कोकणात जावळी मुलुखात आश्रयास आली. त्या शाखेतील ‘नाईक’ हा तानाजींचा हुद्दा असावा. प्रतापगड युद्धानंतर किल्ले राजगड आल्यानंतर शिवरायांनी तानाजी मालुसरे यांना पायदळाच्या हजारी मनसबदार केले. मात्र त्यांच्या हाताखाली एक हजार पायदळ जेधे, बादलांसारखे एकाच बिरादरीचे नव्हते, तसेच एकाच मुलुखातील नव्हते. मोहिमेप्रसंगी सैन्याबरोबर एक हजार हशमांचे मिश्र पायदळसुद्धा दिले जाई. तानाजी मालुसरे स्वराज्यातील कधीही कोणत्याही वतनी सुभ्यावर नियुक्त नव्हते. शिवाजी राजांच्या स्वराज्यात प्रत्यक्ष वतने देण्याचा प्रघात नव्हता. आधी ‘सुभेदार’ हे उपपद लावले गेले. सुभेदार या शब्दाचा अर्थ लष्करातील अधिकारी. सुभा म्हणजे प्रांत, पण तानाजीराव प्रांताधिकारी नव्हते. जेधे शकावलीत तानाजी मालुसरे यांच्या निधनानंतर नोंद आहे की, ‘तान्हाजी मालुसरा राजश्रीकडील हशमांचा सुभेदार पडिला.’
तानाजीराव मालुसऱ्यांचे पूर्वज तापी नदीच्या उतारावर सातपुडय़ाच्या जंगल काठावरचे मूळचे लढवय्ये, म्हणूनच दौलताबादनंतर नगर व वाईला आले. शेवटी ते पांचगणीजवळील गोडोलीला येऊन राहिले. तानाजी मालुसरे यांचे वडील काळोजी व त्यांचा भाऊ भोवरजी किंवा भोरजी हे गोडोलीचे रहिवासी. या गोडोलीवर परक्यांची स्वारी नेहमीच येई. म्हणून काळोजी व भोरजी यांनी शिवाजी महाराजांचा पक्ष घेतला आणि फत्तेखानाच्या स्वारीच्या वेळी त्याचे पारिपत्य करण्याची प्रतिज्ञा या दोन्ही भावांनी वाईजवळच्या आकोशी व नालवाडी या गावी घेतली. आसगावच्या शिंगाण नावाच्या डोहाजवळ झालेल्या सभेत या दोन्ही भावांनी विडे उचलले. वाईच्या सुभेदाराला ही बातमी लागली. त्याने गोडोलीवर अचानक हल्ला करून या दोन भावांचा बंदोबस्त करण्याचे ठरविले. आणि एकाएकी एके रात्री विजापूरकरांचा वाईचा सुभेदार त्या गावात आला. त्याने त्या गावावर अचानक हल्ला करून संपूर्ण गाव बेचिराख करून काळोजी, भोरजी व गोडोलीच्या शूरवीर गावकऱ्यांची कत्तल केली. तानाजीच्या आईने आपल्या दोन मुलांना घेऊन ब्रह्मरण्याचा रस्ता धरला. भोरजीचे मुलगे त्याच्या मामांकडे कोयना खोऱ्यांत फुरस गावाला गेले, तर तानाजी व सूर्याजी या बारा व दहा वर्षांच्या मुलांना घेऊन त्यांची मातोश्री आसऱ्यासाठी प्रतापगडाच्या खाली करंजे गावातून उमरठला आली. तानाजीच्या मातोश्रीने उमरठ गावाजवळच डोंगरात एक घळ आहे, त्यात शिळ्या भाकऱ्या खाऊन तीन दिवस काढले. 10-15 माणसे सहज बसतील अशी उत्तराभिमुख ही घळ अजूनही उमरठलगतच्या डोंगराच्या उतारावर आहे. एक अबला आपल्या लहान मुलांना या ठिकाणी राहतेय हे गावकऱ्यांना जेव्हा कळले तेव्हा त्यांनी या माऊलीला गावात आणले. तोपर्यंत तिचा भाऊ शेलार त्यांचा शोध घेत उमरठला पोहोचला होता. शेलारमामाने त्यांच्या वाटय़ाला आलेले दुःख गावकऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी एक खोपट बांधून दिले आणि नाचणी, वरी पिकविण्यासाठी काही एकर वरकस जमीनही दिली. त्या उमरठ गावात तानाजी-सूर्याजी आठ-दहा वर्षांत गावचेच नव्हे तर साखर खोरे, कामथे खोरे, किनेश्वर खोरे, गोळेगणी खोरे आणि शिवथर खोऱ्यातही प्रसिद्ध झाले होते. शरीर कमावण्यासाठी ते जोर जोडी, मल्लखांब करीत व दिवसभर काबाडकष्ट करीत. तलवार, भाला, बोथाटी चालवता चालवता तानाजी समशेरबहाद्दर झाले. ते दांडपट्टय़ाचे हात इतके सफाईने करीत की पट्टा चालविणारे सराईत गडी त्यांच्याकडे पाहत रहात. वेष पालटण्यातही तानाजी तरबेज होते. कधी सरदारी पोशाखात ते आपल्या जाडजूड काळ्या मिश्यांना पीळ घालून बसले म्हणजे त्यांचा थाट सरदारी दिसे. गोंधळी म्हणून गेले तर ते अडाणी दिसत. दोन्ही भाऊ शेती करीत अन् लढाईचे डावपेच शिकत महाड प्रांतात मोठे प्रख्यात झाले.
अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी तानाजीचे मावळे करंजे-देवळे व गोळेगणी-पैठणच्या खोऱ्यात सशस्त्र तयार होते. तानाजी प्रतापगडावरच भेटीचा सर्व प्रकार दिसेल अशा ठिकाणी बसलेला होते. अफझलखानाचा कोथळा बाहेर येऊन तो कोसळल्यानंतर सय्यद बंडा शामियानात तिरासारखा धावत गेल्यावर तानाजीही धावत गेले. संभाजी कावजी कोंढाळकर, जीवा महाला व तानाजी यांनी खानाचा चेंदामेंदा करून टाकला. खानाच्याच ताकदीचे तानाजी यावेळी धावत आले नसते तर काय झाले असते हे कळण्यासारखे नाही असे कॅ. मोडक यांनी ‘प्रतापगडाचे युद्ध’ या पुस्तकात म्हटले आहे. तानाजी यांनी जावळी खोऱ्याच्या खाली असलेल्या या खोऱ्यात तरुणांची जी एकजूट केली त्यामुळे सन 15 जानेवारी 1656 या दिवशी जावळीचा पाडाव झाला. त्यामुळे शिवरायांचे काम सोपे झाले. जावळी पूर्णपणे ताब्यात येऊन गुढय़ा डोंगराच्या जुन्या गढीचे स्वरूप प्रतापगडात करण्यात आले.
तानाजीचे पुत्र रायबा (रायाजी) संभाजी महाराजांबरोबर असे. म्हाळसोजी या संताजी घोरपडय़ांच्या आजाबरोबरच्या सैन्यात तो नेहमी असे. तानाजींच्या मृत्यूनंतर सूर्याजी त्यांच्या कलेवरासह वेल्हाची पेठ, ढोणीचे पाणी, बिरवाडी, भावे या गावावरून उमरठला आला आणि तेथेच राहिला. सूर्याजींचे तीन मुलगे होते. कान्होजी उमरठला राही. भोरजी कडोशी येथे तर नाईकजी उमरठच्या पायथ्याशी असलेल्या साखर येथे राहू लागला. तानाजीच्या चुलत्याचा म्हणजे भोरजीचा वंश फुरूस या कोयना काठच्या गावाला आहे.
आज पोलादपूर तालुक्यात उमरठ येथे तानाजी मालुसरे व शेलारमामा यांची समाधी आणि लढाईच्या पवित्र्यातील 6 फूट उंचीचा भव्य पुतळा आहे. तर जवळच साखर येथे सूर्याजी मालुसरे यांची समाधी आहे. साखर येथील तानाजी आणि सूर्याजी मालुसरे यांचे वंशज आणि उमरठ येथील कळंबे मंडळी 1930 पासून उमरठ येथे माघ वद्य नवमीला आजतागायत नतमस्तक होत पुण्यतिथी साजरा करीत आली आहे. या वर्षी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी समाधी मेघडंबरीचे आणि परिसराचे नूतनीकरण केले आहे. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या चरित्रात एवढी ताकद आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देश पारतंत्र्यात असताना जनता पेटून उठावी यासाठी तानाजींच्या जीवनावर एक पोवाडा लिहिला. मात्र इंग्रज सरकारने त्यावर बंदी आणली. यंदाच्या 350 व्या सिंहगड महापराक्रमाच्या शौर्यदिनानिमित्त सर्व महाराष्ट्रातील मालुसरे एकत्र होऊन सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे सामाजिक संस्था निर्माण केली आहे आणि पराक्रमाची विजयगाथा हा नरवीर तानाजी-सूर्याजी मालुसरे यांच्या अद्वितीय पराक्रमाची नोंद असलेला एक ग्रंथ ते प्रकाशित करणार आहेत. तानाजीरावांचे चरित्र कितीही गायिले तरी थोडेच. आणि त्यातील थोडे जरी आचरले तरी पुष्कळच.
(लेखक मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष आहेत.)




























































