‘त्या’ भीषण अपघातानंतर धोकादायक विहिरी बुजवण्यासाठी शेतकऱ्यांचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
deola

काही दिवसांपूर्वी देवळा-सौंदाणे रस्त्यावर मेशी फाट्याजवळ एसटी बस आणि अ‍ॅपेरिक्षा यांची धडक होऊन दोन्ही वाहने विहिरीत कोसळून 26 जणांना प्राण गमवावे लागले, त्यानंतर रस्त्याजवळील विहिरींचा प्रश्न ऐरणीवर आला. भविष्यात अशा दुर्घटना घडू नये म्हणून वाखारी येथील तीन शेतकऱ्यांनी पुढाकार घेवून स्वखर्चाने त्यांची एक 50 फूट खोल विहीर बुजवल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.

धुळे येथून कळवणला जाणाऱ्या कळवण आगाराच्या एसटी बसने 5 जानेवारी रोजी दुपारी मेशी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या अ‍ॅपेरिक्षाला धडक दिली, त्यानंतर ही दोन्ही वाहने 70 फूट खोल विहिरीत कोसळली, या भीषण अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला, तर 35 हून अधिक प्रवासी जखमी झाले होते.

या अपघातानंतर रस्त्याजवळील अशा धोकादायक विहिरींचा प्रश्न उपस्थित झाला. भविष्यात अशा दुर्घटना घडू नये, यासाठी देवळा तालुक्यातील वाखारी रस्त्यावरील शेतकरी अर्जुन अंबु आहिरराव, भास्कर अंबु आहिरराव, आणि तानाजी खंडु आहेर यांनी आपल्या मालकीची गट क्रमांक 384 मधील एक विहीर स्वखर्चाने बुजवण्याचा निर्णय घेतला. स्वत:च्या खर्चाने जेसीबी लावून त्यांनी हे विहीर बुजवण्याचे काम बुधवारी पूर्ण केले. वाखारीचे सरपंच राहुल पवार, उपसरपंच डॉ. संजय शिरसाठ, सदस्य नितीन ठाकरे व रमेश खरे यांनी धोकादायक विहिरी बुजवण्याचे आवाहन या भागातील शेतकऱ्यांना केले आहे.