
मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार तर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे. मात्र या दोघांच्याही वाढीव सुरक्षेबाबत पोलीस महासंचालक व मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच निर्णय घेईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना आव्हाड व वडेट्टीवार यांच्या सुरक्षेबाबत विचारले असता या संदर्भात पोलीस महासंचालक यांच्या तसेच राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्णय घेईल, असे ते म्हणाले.
माटुंगा पुलावरील विकृताचे नाव राजुल हबीबूर असे असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे व त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू आहे. पनवेल येथील घटनेचा शवविच्छेदन अहवाल येणे अद्याप बाकी आहे. त्यात सर्व काही स्पष्ट होईल. पण आपण स्वतः यासंदर्भात आयुक्तांशी बोललो असून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचेही देशमुख म्हणाले.



























































