
अंधेरी पूर्व येथील प्रभाग क्र. 81 मधून निवडून आलेल्या भाजपच्या मुरजी पटेल यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे लघुवाद न्यायालयाने आज शिवसेनेचे संदीप नाईक यांची नगरसेवक म्हणून घोषणा केली. यामुळे पालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांची संख्या 97 वर जाणार आहे. 11 फेब्रुवारी रोजी पालिकेच्या महासभेत याबाबत घोषणा होणार आहे.
पालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत प्रभाग क्र. 81 मधून निवडून आलेल्या भाजपच्या मुरजी पटेल यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याबाबत या प्रभागात दुसर्या क्रमांकाची मते मिळवणार्या शिवसेनेच्या संदीप नाईक यांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तपासणीत पटेल यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे सिद्ध झाल्याचे समितीने पालिकेला कळवले होते. त्यामुळे तत्कालीन महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी जुलै 2019 रोजी पालिका सभागृहात मुरजी पटेल यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याचे घोषित केले होते. या पार्श्वभूमीवर संबंधित निवडणुकीबाबत न्या. स्वर्णिता महाले यांनी संदीप नाईक यांची नगरसेवक म्हणून घोषणा करण्यासंदर्भात याचिका मान्य करून त्यांना नगरसेवक म्हणून घोषित करण्याचे निर्देश पालिकेला दिले.
मुरजी पटेल यांच्या पत्नी केसरबेन पटेल यांचेही जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरेले होते. केसरबेन यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध असल्याबाबत काँग्रेसचे नितीन सलागरे यांनी तक्रार केली होती. यात तथ्य आढळल्यामुळे लघुवाद न्यायालयाने काँग्रेसच्या सलागरे यांना नगरसेवक म्हणून घोषित केले होते.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच कांदिवली प्रभाग क्र. 28 मधील काँग्रेसचे नगरसेवक राजपती यादव यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे शिवसेनेच्या एकनाथ हुंडारे यांनाही लघुवाद न्यायालयाने नगरसेवक म्हणून घोषित केल्याने शिवसेना नगरसेवकांची संख्या 97 वर होणार आहे.





























































