पुण्यात रेल्वेचा पहिला ‘सायबर सेल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cyber-police

गुन्हे करण्याचे बदललेले स्वरुप विचारात घेता रेल्वे मंत्रालयाने आता ‘सायबर क्राईम सेल’ सुरू करण्याचा निर्णय घेतला असून देशातील पहिला सायबर सेल पुण्यात सुरू करण्यात आला आहे. यामुळे सायबर सेलच्या माध्यमातून आता रेल्वेतील ऑनलाईन गुन्ह्यांना आळा घालण्यास मदत होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी रेल्वेच्या पुणे आणि सातारा विभागातील विविध कामांची पाहणी केली. यानंतर पुणे येथील कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मित्तल बोलत होते. याप्रसंगी पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा, मुख्य जनसंपर्क अधिकारी (मुंबई) शिवाजी सुतार आदी उपस्थित होते. यावेळी मित्तल यांनी रेल्वे प्रशासनाकडून सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहीती दिली.

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ऑनलाईन व्यवहार, ई-ट्रेडिंग आदींच्या सहाय्याने ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. बनावट ओळखपत्रांच्या आधारे रेल्वेचे ऑनलाईन तिकीट बुकींग करुन ते महागड्या किंमतीने विकले जात असल्याचे प्रकार वारंवार उघडकीस आले आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. दिवसेंदिवस गुन्हे करण्याचे स्वरूप बदलत असून त्याचा छडा लावण्याकरिता आरोपींचा सीडीआर काढणे, त्यांचे टॉवर लोकेशन तपासणे आदींची तातडीने गरज पडते. त्याकरिता आता रेल्वे मंत्रालयाने देखील सायबर सेल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पहील्या टप्यात देशातील प्रमुख 6 ठिकाणी सायबर क्राईम सेल तयार करण्यात येणार असून पहिला सेल पुण्यात सुरु करण्यात आला आहे. याठिकाणी काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले, असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

ऑनलाईन गुन्ह्याच्या छडा लावण्यासाठी सायबर सेल तयार करण्यात आला आहे. यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून इतर काही तज्ज्ञ लोकांची मदत घेण्यात येत आहे.

– अरुण त्रिपाठी, विभागीय सुरक्षा आयुक्त, आरपीएफ