
नांदेड जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायतच्या पोटनिवडणुकीत 6 पैकी 5 जागा जिंकून महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकावला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने हा दणदणीत विजय मिळवला आहे.
राज्यात महाविकास आघाडी झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील ही पहिलीच पोटनिवडणूक होती. या निवडणुकीत भाजपला भोपळाही फोडता आलेला नसून, एका ठिकाणी अपक्ष उमेदवार निसटत्या मताधिक्क्याने विजयी झाला. या घवघवीत यशाने नांदेड जिल्ह्यात महाविकास आघाडी अधिक मजबूत झाली आहे.
पोटनिवडणुकीत नांदेड-वाघाळा महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. 11 (ड) मध्ये अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार 1 हजार 866 मतांनी, धर्माबाद नगर परिषदेच्या वार्ड क्र.2 (अ) मध्ये कविता नारायण बोलमवाड 229 मतांनी, वॉर्ड क्र. 4 (अ) मधून सायारेड्डी पोशट्टी गंगाधरोड 466 मतांनी, हिमायतनगर नगर परिषदेच्या वार्ड क्र. 13 मधून अजगरी बेगम अ. रहेमान 341 मतांनी, नायगाव नगर पंचायतच्या वार्ड क्र. 1 मध्ये बोईनवाड हणमंत आनंदराव 207 मतांनी विजयी झाले असून, बिलोली नगर परिषदेच्या वार्ड क्र. 5 (अ) मध्ये लक्ष्मण शंकरराव शेट्टीवार यांना केवळ 70 मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले असून, मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले आहेत.






























































