हिरवंगार चैतन्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मलिका अमरशेख

निसर्गाच्या ठायी असलेलं चैतन्य हाच सृष्टीचा खरा स्थायिभाव. म्हणूनच ऋतूंचा सोहळा कायमच स्वागतार्ह वाटतो. सृष्टीतील ऋतूंमध्ये बदल नसता तर सृष्टी निर्जीव झाली असती. सृष्टीतील हे बदल, त्यातील मोहकता आपल्याला नयनसुखच देतात. माणसाच्या जगण्यातल्या चैतन्याचा निसर्ग हाच मुख्य गाभा. या निसर्गाला कितीही झिडकारलं तरी त्याचे कोंब त्यांचं चैतन्य गमावत नाहीत… अगदी झाडापासून विभक्त झाल्यानंतरही ताज्या मुळांसह, पानाफुलांसह झाड पुन्हा विस्तारू लागतं.

मिस्टर आरण्यक वनस्पती शास्त्रज्ञ… नुकतीच त्यांनी एक छोटी टुमदार बंगली घेतलेली. सभोवताली मोठी बाग – मोकळं रान.. बंगलीमागे गर्द झाडांचं छोटेखानी जंगलच न् त्यामागे दिसणारी टेकडय़ांची रांग.. हिरव्यागर्द झाडांवर ढगांचे पुंजके तुऱयासारखे असलेले डोंगर… असीम नीरव शांतता… अशात मिस्टर आरण्यक आपले वेगवेगळाले प्रयोग करण्यात गुंतलेले… प्रचंड वटवृक्षाचा बोनसाय करून छोटे वड… छोटे पिंपळ… आंब्याच्या झाडाला बोराएवढे आंबे… नारळाची खेळातल्या झाडाप्रमाणे छोटे बोनसाय… झाडं… छोटय़ा जांभळाच्या आकाराएवढाले नारळही त्याला आलेले! मिस्टर आरण्यक खूश!
त्यांची 75 वर्षांची आई मात्र भयंकर नाराज… ‘अरे, वेडा झाला का खुळा… देवाच्या व्यवस्थेत ढवळाढवळ करू नये बाबा… बोराएवढय़ा नारळात चिमटीएवढं खोबरं कुठल्या भाजीला पुरणाराय…?
न् करवंदाएवढे आंबे कोण खाणार?
बाई बाई – शर्थ झाली… उद्या तू मला पण 2 फुटांची बुटकी आई करून टाकशील.
‘अग आई हा प्रयोग आहे फक्त.’
‘असले कसले डोंबलाचे प्रयोग… उद्या तुझ्यावर कुणी प्रयोग करून तुझं 5 वर्षांच्या पोरग्यात रूपांतर केलं तर मी नाही हो तुला सांभाळू शकणाराय!’
‘आई, भलते विनोद करू नका.’
हसत हसत मिस्टर आरण्यक बागेकडे निघून गेले.
अचानक एक फूट वाढलेल्या केळीच्या झाडावरली केळी तपासताना त्यांचं लक्ष गेलं… बंगल्याच्या बागेच्या बाहेरच्या कडेला जो प्रचंड वटवृक्ष होता त्याची एक भलीमोठी फांदी सरळ बंगल्याच्या कौलावर आली होती… वादळ-पाऊस… वीज… यात जर ती फांदी तुटली तर बंगलीचं मोठं नुकसान होणार होतंच, पण माणसांच्या जीवालाही धोका होता. मिस्टर आरण्यकांनी माणसांना बोलावून ती फांदी तोडून टाकली.
दोन दिवसांनी मात्र मिस्टर आरण्यक चांगलेच दचकले.. वडाच्या दोन फांद्या वर उंच वाढून त्यांना कोवळी पालवीही आलेली आणि दोन दिवसांनी त्या फांद्या पुनश्च बंगलीवर येण्याची चिन्हं होती. मिस्टर आरण्यकांनी त्याही फांद्या छाटल्या..

…आणि त्यानंतर दोन दिवसांनी हॉलमध्ये सकाळचा चहा पीत बसलेल्या मिस्टर आरण्यकांचे डोळे विस्फारले गेले. चहाचा कप हिंदकळून चहाही त्यांच्या नाइट गाऊनवर सांडला. ते घाईनं उठले.. हॉलच्या दरवाजाच्या बाहेर फरशीला तडा गेलेला न् त्यातून एक जाडजूड दोरखंडाइतकं झाडाचं मूळ डोकावत होतं…! मिस्टर आरण्यक हादरले, गोंधळले… हे काय बरं? बाहेर बंगलीच्या कुंपणाकडला वटवृक्ष आपली पाळंमुळं बंगलीच्या खाली पसरू लागलेला!
वरच्या अजस्र फांद्या तोडल्यावर जणू वटवृक्षानं हे गनिमी मुळांचं सैन्य थेट आरण्यकांच्या किल्ल्यात घुसवलं!

कामगारांना बोलावणं गेलं. तेही अत्यानंदात आले. त्या एका झाडामुळं तीन-चार लोकांना आयता रोजगार मिळाला होता. झाडाचं मूळ उपटलं गेलं…खणून… फरशी पुन्हा बसवली गेली, पण पुन्हा चार दिवसांनी हॉललगतच्या बेडरूममध्ये पुन्हा एक मूळ जमीन उखडून वर आलेलं…
आता मात्र मिस्टर आरण्यक संतापानं वेडेपिसे झाले. झाडानं जणू सर्व बाजूंनी बंगलीला वेढा घातलेला. त्यांनी बराच विचार करून पूर्ण झाडच तोडण्याचा निर्णय घेतला. तसं पाहता ते झाड त्यांच्या मालकीच्या बंगलीच्या कक्षेत होतं. त्यामुळे कुणाच्या परवानगीची गरज नव्हती, पण तरीही त्यांनी आपल्याबरोबर काम करणाऱया इतर वनस्पती शास्त्र्ाज्ञांना निमंत्रित करून एक छोटी पार्टी मीटिंग आयोजित केली… सर्वांनी ते झाड – बंगली – बाग – जमीन यांचं नीट सर्वेक्षण केलं. बराच खल झाल्यावर ते सर्वच एका गोष्टीशी सहमत झाले… जरी ते झाड तोडलं तरी उपयोग होणार नव्हता. कारण मुळांना जमिनीखालून पाणी इ. जीवनावश्यक गोष्टी मिळणार होत्या न् वटवृक्ष खूप जुना असल्याने त्याची मुळं खाली किती न् कुठवर पोचलीयत याचा अंदाज येणं कठीणच होतं. बऱयाच वेळी मुळं खूप खोल न् दूरवरसुद्धा पसरू शकतात. त्यामुळे मिस्टर आरण्यकांनी झाड तोडण्यापेक्षा बंगला सोडणंच श्रेयस्कर… आरण्यक चरफडत राहिले.

आई करवादत राहिली… ‘तरी मी सांगत होते… त्यांच्या हिरव्या व्यवस्थेत ढवळाढवळ करू नकोस. त्यांना त्यांच्याप्रमाणं राहू दे. आपल्याला अन्न मिळावं म्हणून भाज्या, नारळ, आंबा…किती गोड फळं. ऐन उन्हाळय़ात गारगार कलिंगड खाऊन मन, पोट कसं तृप्त होतं. तू चाक उलट फिरवायला गेलास. तो बघतो बरं वरून… लहानपणापासून झाडापानांची तुला आवड म्हणून तुझं नाव आरण्यक ठेवलं तर तू आपल्या बापाचा बाप व्हायला गेलास… जाऊ दे, सोडू या बंगला. वडाला वडासारखं वाढू दे… अरे… वडा-पिंपळाच्या भल्याथोरल्या सावलीत उन्हानं पोळलेले जीव शांतवतात… या टीचभर वडाच्या खाली फक्त मुंगीला आराम मिळेल, माणसाला नाही. त्यांची मुळं कापून त्यांना बुटकं करण्याऐवजी तूच उंच वडासारखा हो ना… आपल्या प्रेमाची सावली त्यांना दे – बघ, मग तू कुठंही बाग लावलीस तरी केवढी बहरतील ही उंच झाडं!’

आईच्या या लांबलचक भाषणानं मिस्टर आरण्यकांनी निमूट पुन्हा कामगारांना बोलावून सामान पॅक करायला सुरुवात केली…!
…त्यावेळी एक हिरवंगार हसणं.. खळाळत्या चैतन्याचं कुणीच ऐकलं नाही… न् फुलांच्या पाकळय़ांनी वाजवलेल्या टाळय़ा, त्याही कुणीच ऐकल्या नाहीत. वारा मंद हसत वडाच्या झाडापानाला गोंजारत आनंदानं गिरक्या घेत होता बागेभोवती!

[email protected]