
बोगस नोटा चलनात आणून हिंदुस्थानची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा पाकिस्तानचा डाव मुंबई गुन्हे शाखेने आज उद्ध्वस्त केला. दुबईहून आलेल्या कळव्यातील एका तरुणाला गुन्हे शाखेने सकाळी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर ताब्यात घेतले असता दोन हजार किमतीच्या 23 लाख 86 हजारची रोकड सापडली. या प्रकरणाशी दहशतवादी संघटनेचा संबंध असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
रविवारी सकाळी दुबईहून एक तरुण मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार असून बाहेरच्या बसस्टॉपवर येणार आहे. त्याच्याजवळ उच्च प्रतीच्या दोन हजार रुपये किमतीच्या बोगस नोटा असल्याची खबर केंद्रीय संस्थेकडून गुन्हे शाखा युनिट-8 ला देण्यात आली. त्यानुसार उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक अजय जोशी, एपीआय चौगुले, विचारे तसेच साळवी, रवींद्र माने, जंगम आदींच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे टी-2 येथील बसस्टॉपजवळ सापळा रचून जावेद गुलामनबी शेख (36) या कळव्यातील इसामास ताब्यात घेतले. या नोटा पाकिस्तानातून दुबईत आणण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुबईतून या नोटा मुंबई व आजूबाजूच्या परिसरात वितरित करण्यासाठी मी आणल्या अशी कबुली जावेदने दिल्याचे सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी सांगितले.
- जावेदजवळ सापडलेल्या नोटा उच्च प्रतीच्या आहेत. पण नोटा बारकाईने पाहिल्या तर त्यांचा आकार किंचितसा मोठा, शाई थोडी फुटलेली आणि मधल्या तारेत कमी-जास्तपणा आहे.
- विमानतळावर सामानाची कसून तपासणी होते, पण जावेदने त्याच्या ट्रॉली बॅगेत अजिबात समजणार नाही अशा पद्धतीने नोटा लपवल्या होत्या. त्यामुळे तो विमानतळावरून सुखरूप बाहेर आला.































































