ग्रॅण्ट रोडच्या पुलाचा गर्डर आठ तासांच्या ब्लॉकमध्ये हटविला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटिशकालीन ग्रॅण्ट रोड स्थानकाच्या फेरेरे उड्डाण पुलाचा गर्डर शनिवारी मध्यरात्री पश्चिम रेल्वेच्या विशेष आठ तासांच्या ब्लॉकमध्ये यशस्वीपणे हटविण्यात आला. पश्चिम रेल्वेच्या अभियंत्यांसह 150 जणांच्या टीमने 350 मेट्रिक टनाच्या दोन अजस्त्र क्रेनच्या मदतीने हा गर्डर हटविला. याकरिता शनिवारी रात्री 10.15 ते सकाळी 6.15 दरम्यान चर्चगेट आणि मुंबई सेंट्रलची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

पश्चिम रेल्वेच्या ग्रॅण्ट रोड स्थानकाजवळचा फेरेरे हा ब्रिटिशकालीन पूल सन 1921 मध्ये बांधलेला असून तो जुना झाल्याने वाहतुकीसाठी 16 जानेवारीच्या रात्रीपासून बंद करण्यात आला होता. हा पूल बांधण्यासाठी खरे तर ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’कडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु या पुलाचे बांधकाम लवकर करणे गरजेचे असल्याने पश्चिम रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनकडे या पुलाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.

या पुलाचा रेल्वेवरील परीघ 14 मीटर रूंद तर 25 मीटर लांब आहे. या पुलावर दोन मुख्य गर्डर, 11 क्रॉस गर्डर्स आणि 14 दुय्यम गर्डर तसेच 10 तृतीय गर्डरचा समावेश आहे. या पुलावरील 220 मेट्रिक टन स्टील आणि 350 चौरस मीटरचा स्लॅब अवघ्या 24 दिवसांत हटविण्यात आला. यात एमटीएनएलच्या केबल आणि ओव्हरहेड वायर हटविण्याचे काम करण्यात आले. 2.1 मीटर खोलीचे 35 टन वजनाचे दोन मुख्य गर्डर 15 टनाचे दोन क्रॉस गर्डर त्यांच्या बेअरिंगसह 350 मेट्रिक टनाच्या क्रेनच्या मदतीने हटविण्यात आले. येथे आता नवा गर्डर टाकण्याचे काम पश्चिम रेल्वेचे इंजिनीअर करणार आहेत. शनिवारी मध्यरात्री आठ तासांच्या नाईट ब्लॉकद्वारे हे गर्डर हटविण्याचे महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी काम करण्यात आले. त्यामुळे चर्चगेट ते मुंबई सेंट्रल सेवा बंद ठेवण्यात आली होती. मुंबई सेंट्रलहून पुढे विरारच्या दिशेने 136 लोकल चालविण्यात आल्याने तसेच अनेक लोकल आणि मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे शनिवारी प्रचंड हाल झाले.