
दरवर्षी देशात विविध भागांत निवडणुका होतात. परंतु इतर देशांच्या तुलनेत हिंदुस्थानातील प्रतिमतदारांवर कमी प्रमाणात खर्च केला जातो. अन्य देशांत 25 डॉलर प्रतिमतदारासाठी खर्च होतात. तर हिंदुस्थानात हे प्रमाण 1 डॉलर असे आहे. या हिशेबाने हिंदुस्थान आजही गरीबच आहे. असे असले तरी हिंदुस्थानी राजकीय पक्षांनी विकास केला आहे. पार्टी फंडच्या नावावर हा विकास झाला आहे. प्रचारात हा पैसा वापरला जात असल्याचे माजी निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी सांगितले. राजकीय पक्षांकडून होणाऱया अमर्यादित खर्चावर त्यांनी चिंता व्यक्त केली.
नागपूर येथील सिव्हिल लाईन्स स्थित नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्हीव्हीपॅटवरील मतदान यथायोग्य असल्याचे सांगत ते म्हणाले की, निवडणुकीत राजकीय पक्षांचे बजेट अमर्यादित झाले आहे. यावर निर्बंध लावण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते आहे. निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. ऑनलाईन पोर्टल, लघुपट, पथनाटय़ आदींचा वापर केला जात असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. फेक न्यूज हा चिंतेचा विषय आहे. राजकीय पक्षांनी पार्टी फंडाच्या नावाने त्यांचा विकास केला आहे. प्रचारात हा पैसा वापरला जातो. याकरिता निवडणूक आयोगदेखील कमकुवत ठरत आहे. मतदारांचे ओळखपत्रांसह आधार कार्ड जोडण्याची योजना आवश्यक आहे, असे रावत म्हणाले.
































































