सैन्य दलांमध्ये महिलांना कमांड पोस्ट देणार, सर्वोच्च न्यायालयात लष्कराचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या लष्करी दलांत महिला ज्या पदांवर काम करण्यास सक्षम आहेत त्या सर्व कमांड पोस्ट त्यांना दिल्या जातील, अशी हमी लष्कराने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. सैन्य दलांचे हित लक्षात घेऊन महत्त्वाच्या पदांवर महिलांची नियुक्ती केली जाईल. या नियुक्त्यांमध्ये पुरुष-महिला असा भेदभाव केला जाणार नाही, असेही लष्करी प्रशासनाने या वेळी सांगितले. केंद्र सरकारनेही लष्करी दलांत महिलांच्या नियुक्त्यांबाबत वेगळा दृष्टिकोन ठेवावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.

महिलांना स्थायी कमिशन देण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात 5 फेब्रुवारीला सुनावणी झाली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने नौदलाला आपल्या सर्व महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमिशन देण्याचा आदेश मार्च 2010मध्ये दिला होता. त्या आदेशाविरोधात संरक्षण मंत्रालयाने अपील दाखल केले आहे. या प्रकरणी काही महिला अधिकाऱ्यांनीही आव्हान दिले आहे. या अपिलांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. आम्ही नौदल आणि हवाई दलात महिलांना कमांड पोस्ट देण्याच्या मुद्द्याचाही विचार करणार आहोत, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारच्या सुनावणी वेळी स्पष्ट केले.

महिला अधिकाऱ्यांना पेन्शन देण्याचाही विचार
आपल्या सेवेच्या अटी पूर्ण केल्या आहेत, त्या महिला अधिकाऱ्यांना पेन्शन देण्याबाबतही लष्कर विचार करीत आहे. आपण जे काही निर्णय घेतले आहेत ते सर्व कर्मचाऱ्यांच्या हितासाठीच घेतलेत, असा दावाही लष्कराने केला.