
सेंच्युरी मारलेल्या कांद्याने किचन कॅबिनेट कोलमडले असतानाच आता औषधी आणि रुचकर समजल्या जाणाऱ्या पांढऱ्या कांद्यानेदेखील ‘भाव खाल्ला’ आहे. अवकाळी पाऊस, त्यातच बुरशीने हल्ला केल्याने या वर्षी निम्मे उत्पादन घटले आहे. त्यामुळे दीडशे रुपयांना मिळणारी माळ ही थेट साडेतीनशे रुपयांवर गेली असून यात अजून भाववाढ होण्याची शक्यता आहे. दर कडाडल्याने खास करून उन्हाळ्यात चवीने हा कांदा खाणाऱ्या खवय्यांना खिशाकडे पाहूनच खरेदी करावा लागत आहे.
पोहे, कुरकुरीत पापड, रायगडात मिळणारा खास तांदूळ, मिरगुंड, चिकोड्या याचा बाजारच वडखळच्या नाक्यावर दुतर्फा दिसतो. मुंबईतून कोकणात किंवा पर्यटनवारी करून घरी परतणाऱ्या प्रत्येकाचीच पावले वडखळच्या नाक्यावर स्थिरावतात. यात खास करून पांढरा कांदा घेण्याकडे सर्वांचा अधिक कल असतो. अलिबाग व पेणच्या या पांढऱ्या कांद्यात उत्तम जीवनसत्त्व असल्याने या कांद्याला बाजारात प्रचंड मागणी आहे. अलिबागमध्ये अडीचशे हेक्टरवर दरवर्षी पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. मात्र यावेळी अतिवृष्टी झाल्याने पांढरा कांदा लावणारी जमीन प्रमाणापेक्षा जास्त पाण्याखाली गेली. त्यामुळे या वर्षी 232 हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली. तर 18 हेक्टर लागवडीचे क्षेत्र हे रिकामे राहिले आहे. भातशेती कापणी झाल्यानंतर या पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. मात्र यावेळी अवेळी पावसाने शेतामध्ये जमिनीतील पाणी तसेच राहिल्याने कांद्याच्या रोपट्याच्या मुळांना बुरशी पकडली गेली. त्यामुळे उत्पादन घटले असून दीडशे रुपयांना मिळणारी पांढऱ्या कांद्याची माळ तीनशे-साडेतीनशे रुपयांवर गेली आहे.
अतिवृष्टीने पांढरा कांदा लागवड जमीन ही ओली असल्याने कांद्याच्या रोपट्याला बुरशी रोग झाला आहे. त्यामुळे पांढरा कांदा लागवड क्षेत्र कमी झाले असून आलेल्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रम्प आणि कार्बनडिझम फवारणी करण्याचे मार्गदर्शन केले आहे. – बी. आर. जानुगडे,
तालुका कृषी अधिकारी.अतिवृष्टीने पांढरा कांदा लागवड जमीन ही ओली असल्याने कांद्याच्या रोपटय़ाला बुरशी रोग झाला आहे. त्यामुळे पांढरा कांदा लागवड क्षेत्र कमी झाले असून आलेल्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रम्प आणि कार्बनडिझम फवारणी करण्याचे मार्गदर्शन केले आहे. – बी. आर. जानुगडे, तालुका कृषी अधिकारी.




























































