भाजपच्या पराभवाची मालिका थांबेल असं वाटत नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जाणीवपूर्वक धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न फसला आहे. भाजपला पर्याय देणाऱया पक्षाला जनतेने कौला दिला. भाजपच्या पराभवाची मालिका सुरू झाली आहे. ती थांबेल असं वाटत नाही. केजरीवालच जिंकतील असा कौल होता. त्यामुळे निकालाचं मला वैयक्तिकरीत्या आश्चर्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत दिली.

पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले. या निकालावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, ‘दिल्लीच्या निवडणुकीचा अंदाज मी दिल्लीत असताना घेतला होता. माझ्या तिथल्या निवासस्थानातील कर्मचाऱयांशी बोललो होतो. मराठी भाषिक लोक राहत असलेल्या करोल बागमध्येही मी कानोसा घेतला होता. सगळे केजरीवालांचे नाव घेत होते. मागील वेळी भाजपला मत देऊन फसल्याची त्यांची भावना होती. याउलट केजरीवालांनी त्यांच्या दैनंदिन समस्या सोडवल्याचे त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे दिल्लीच्या निकालाचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. भाजपचा पराभव होणारच होता,’

अहंकाराने भाजपचा पराभव केला

मला वैयक्तिकरीत्या आशचर्य वाटत नाही. मी दिल्लीत राहतो. केजरीवालच जिंकतील असं सगळेच सांगायचे. हा निकाल दिल्लीपुरता मर्यादित नाही. भाजपला अहंकार भयंकर होता. मोदी आणि शहा यांच्याबाबत अस्वस्थता सत्ताधारी पक्षाातही आहे. संसदेच्या सदस्यांमध्ये दहशत आहे. हीच नाराजी ती मतांच्या रूपात व्यक्त झाली. याआधी राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये भाजपचा पराभव झाला. भाजपच्या पराभवाची मालिका सुरू झालीय, ती थांबेल असं वाटत नाही. धार्मिक धुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न फसला. गोळ्या घाला, मारा, अशा प्रकारच्या प्रचाराला उत्तर म्हणून भाजपचा पराभव झाला आणि दिल्लीकरांनी केजरीवालांना कौल दिला.

राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आझाद मैदानातील सभेत दगडाचं उत्तर दगडाने आणि तलवारीचं उत्तर तलवारीने दिलं जाईल असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारले असता शरद पवार म्हणाले, ‘याची गांभीर्याने नोंद घ्यायची नसते. राज्याच्या राजकारणावर ज्यांच्यामुळे परिणाम होऊ शकतो अशांची दखल घ्यायची असते. काहीतरी बोलून गेले. काही लोक काहींची भाषणं ऐकायला येतात. काहींची भाषणं बघायला येतात. अशा प्रकारची भाषणं होत असतील तर ती एक करमणूक असते.’