आभाळमाया – गगनयानातील व्योमित्रा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक ([email protected])

गॉलिलिओच्या काळापासून अवकाशाच्या आधुनिक अभ्यासाला गती आली हे खरंच, पण त्यापूर्वीही बाराव्या शतकात भास्कराचार्यांसारखे खगोलविद् आपल्या देशातूनही अवकाशाचा वेध घेतच होते. मात्र दुर्बिणीचा शोध लागला आणि ग्रहताऱ्यांचे वैज्ञानिक स्वरूप अधिकाधिक स्पष्ट होऊ लागले. त्याच्या पुढची पायरी म्हणजे 1903 मध्ये विमानाचा शोध लागल्याने माणसाने आकाशझेप घेतली. पृथ्वीवरचा प्रवास वेगवान झाला. विमानांमध्ये सुधारणा होत आणि वेग वाढवत जग जास्तीत जास्त जवळ आलं.

आता माणसाला त्यापलीकडचं अवकाश खुणावत होतं. आपल्या ग्रहाच्या वातावरणात अधांतरी भिरभिरणाऱ्या विमानांपलीकडे जाऊन वातावरण भेदून थेट अवकाशात भ्रमण करण्याची ईर्ष्या बळावत गेली. त्यासाठी सोविएत युनियन (रशिया) आणि अमेरिकेतील संशोधक जिवाचं रान करू लागले. सर्वप्रथम ‘स्पेस’वारी कोण करणार? या स्पर्धेत रशिया जिंकला. 1957 मध्ये रशियाचा स्पुटनिक नावाचा पहिला कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती परिक्रमा करू लागताच अवघे जग विस्मयचकित झाले. त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे 12 एप्रिल 1961 रोजी रशियाने युरी गागरिन यांना अंतराळात धाडून क्रांती घडवली.

रशियाचे हे दशदिशांपलीकडचे अवकाशविजय अमेरिकेला धास्तावणारे वाटणारच होते. त्या शीतयुद्धाच्या काळात अवकाशस्पर्धाच सुरू झाली. 1999 मध्ये अमेरिकेने माणूस थेट चंद्रावरच उतरवला आणि त्यांचा जीव भांडय़ात पडला.

परंतु त्याआधी रशियाने 1963 मध्ये वॅलेंटिना तेरेस्कोवा या जगातल्या पहिल्या महिला अवकाशयात्रीला अंतराळात पाठवून नवा विक्रम घडवलाच होता. या दोन राष्ट्रांची अवकाश पादाक्रांत करण्याची चढाओढ 1990 नंतर थांबली. पण तोपर्यंत पृथ्वीवरचे अनेक देश अवकाश जिंकायला सिद्ध झाले होते. हिंदुस्थाननेही रशियाच्या मदतीने आधी आर्यभट्ट नावाचा देशी उपग्रह आणि 1984मध्ये आपला अंतराळवीर राकेश शर्मा यांना अंतराळात पाठवलं.

माणूस अंतराळात पाठवण्याआधी मात्र अंतराळातील निर्वात वातावरणाचा आणि वजनरहित अवस्थेच्या अत्यल्प गुरुत्वाकर्षणाचा (मायक्रोग्रॅव्हिटीचा) परिणाम सजीवांवर नेमका काय होतो ते जाणून घेण्याचे प्रयोग फार पूर्वीपासून म्हणजे 1947 पासूनच सुरू झाले होते. त्या वर्षी अमेरिकेच्या व्ही-2 रॉकेटमधून फळमाशांना अंतराळात पाठविण्यात आलं. 3 मिनिटांत, अंतराळात 109 किलोमीटर उड्डाण केल्यानंतरही हे लहानसे सजीव सुखरूप राहिले. त्यानंतर 1949 मध्ये अल्बर्ट या माकडाला 100 कि.मी. अंतरावर रॉकेटमधून पाठवलं होतं. ते त्याच्या जिवावर बेतलं. 1950 मध्ये उंदरांची अंतराळास्वारी झाली. 1951 मध्ये रशियाने डेविक आणि त्सिगन या श्वानांना अंतराळात पाठवलं. ‘समज’ असलेले अंतराळात जाणारे हे पहिलेवाहिले प्राणी. त्यांच्या यानाने फारच कमी वेळाचं यशस्वी उड्डाण केलं.

पृथ्वीभोवती परिक्रमा करणारा पहिला प्राणी म्हणजे लायका कुत्री. 1957 मध्ये स्पुटनिकने अवकाशात झेत घेतल्यानंतर लगेच ‘लायका’ला अवकाशात पाठवलं, परंतु त्या प्रवासात तिचा अंत ओढवला. 1973मध्ये तर ‘स्कायलॅब’मध्ये पाठवलेल्या गोल्डन कोळय़ाने तिथे जाळंसुद्धा विणलं!

अंतराळात ‘प्रायोगिक’ म्हणून प्राणी पाठवणं नंतरच्या कळात टीकेचं लक्ष्य होऊ लागलं. तोपर्यंत संगणकीय प्रगती होऊन ‘यंत्रमानवा’ने ‘जन्म’ घेतला होता. आता त्याचा वापर अंतराळयानांमध्ये करणं शक्य होतं.

2015 ते 19 या काळात आधी ‘अवतार’ नाव असलेल्या हय़ुमनॉइड म्हणजे मानवी प्रज्ञेचा यंत्रमानव अंतराळात पाठवला गेला. त्याने फेडर नावाने उत्तम कामगिरी बजावली. 2019च्या एप्रिलमध्ये तर त्याने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या बाहय़ दुरुस्तीमध्येही यशस्वी सहभाग नोंदवला.

अंतराळ प्रगतीचे वारे हिंदुस्थानातही पोहोचले. आपल्या ‘इस्रो’ने स्वतःचं क्रायोजेनिक इंजिन बनवून भूस्थिर कक्षेत उपग्रह सोडण्यापासून चांद्रयान, मंगळयान असे प्रयोग यशस्वी करून दाखवले. या चांद्रयान-2च्या अपयशाने खचून न जाता ‘गगनयान’ पाठविण्याचा निर्धार केला.

सुमारे साडेतीन टन वजनाचं आपलं गगनयान अवकाशात 400 किलोमीटर अंतराळावरून पृथ्वीभोवतीच्या कक्षेत फिरणार आहे. 2021 मध्ये अवकाशात जाणाऱ्या या यानात एक मदतनीस असणार आहे ‘व्योमित्रा’ नावाची हय़ुमनॉइड. आधी ‘व्योमित्रा’ (व्योम म्हणजे अवकाश. त्याची मित्र ती व्योमित्रा) एकटी अवकाशात जाऊन वजनरहित अवस्था आणि अवकाशीय प्रारणांचा माणसावर काय परिणाम होतो याचा अंदाज घेईल. नंतर अंतराळवीरांना मदत करील.

2006 पासूनच ‘गगनयान’ मोहिमेची आखणी झाली. आता पुढच्या वर्षी हे यान अवकाशात 7 दिवस राहणार आहे. सुमारे 120 अब्जांचा खर्च करून जाणाऱ्या या यानात अनेक कामे करायची आहेत. त्यासाठी ‘व्योमित्रा’ सहाय्य करेल. कारण तिला माणसं ओळखणं, त्यांच्यासारखी कामे करणे, तंत्रज्ञानाची जाण असणे, अनेक प्रश्नांची उत्तरं देणे असे अनेक गुण आहेत. आपल्या अवकाश संस्थेचे हे प्रयोग निश्चितच यशस्वी होतील. ‘इस्रो’ला त्यासाठी सदिच्छा देऊया.