सराव सामन्यात हनुमा विहारी चमकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हनुमा विहारी व चेतेश्वर पुजारा या जोडीने पाचव्या विकेटसाठी 195 धावांची दमदार भागीदारी करीत फलंदाजीचा कसून सराव केला. हनुमा विहारीने 3 षटकार व 10 चौकारांसह 101 धावांची, तर चेतेश्वर पुजाराने 1 षटकार व 11 चौकारांसह 93 धावांची खेळी केली.

हॅमिल्टन ः इंडियन्स आणि न्यूझीलंड इलेव्हन यांच्यामधील तीनदिवसीय सराव सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली. 21 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया कसोटी मालिकेआधी होत असलेल्या या सराव सामन्यात पृथ्वी शॉ, शुभमन गिल या युवा खेळाडूंच्या कामगिरीवर साऱयांचे लक्ष होते, पण पहिल्या डावात दोघेही अपयशी ठरले. एवढेच नव्हे तर, मयांक अग्रवालकडूनही निराशा झाली. तीन सलामीवीर अपयशी ठरत असतानाच हनुमा विहारी याने 101 धावांची खेळी साकारली. यामुळे त्याचे पहिल्या कसोटीचे तिकीट बुक झाले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

हिंदुस्थानी संघाचा पहिला डाव 263 धावांमध्येच आटोपला.
हिंदुस्थानी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मध्यमगती गोलंदाज स्कॉट कुगेलीन याने हिंदुस्थानी संघाला तीन झटके दिले. तेही 5 धावांच्या मोबदल्यात. पृथ्वी शॉ (0), मयांक अग्रवाल (1 धाव) व शुभमन गिल (0) यांना त्याने पॅव्हेलियनमध्ये पाठवले.