
आपल्या शाळेत शिकणार्या बालकांना अधिकाधिक शैक्षणिक सुविधा प्राप्त व्हाव्यात व आपली शाळा सर्वांगीण व शैक्षणिक दर्जात्मक निर्माण व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणार्या शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील तांदळीच्या माळवाडीतील अनेक ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला सर्वांगीण भरीव मदतीचा हात दिला आहे.
शिरूर येथील निसर्गाच्या सानिध्यात सुरु असलेल्या 2 शिक्षकी माळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सध्या परिसरातील 46 विद्यार्थी प्राथमिक शिक्षणाचे बाळकडू घेत आहेत. शिक्षणप्रेमी आजी अंजनाबाई पोपटराव गदादे आजींनी मुलांना बसण्यासाठी सुसज्ज इमारत व्हावी या हेतूने आपल्या बागायती जमिनीतील 6 गुंठे जागा शाळा इमारतीसाठी विनामूल्य स्वखर्चाने बक्षीसपत्र करून दिली.
इमारतीस जागा मिळाल्याने माळवाडी व परिसरातील ग्रामस्थांनी शाळेची सुंदर वास्तू उभारायचा संकल्प करीत लोकवर्गणी, देणगी व काही निधीच्या माध्यमातून इमारतीचे बांधकाम सुरु केले असून हे काम लवकरच पूर्णत्वाकडे जाणार आहे. या कामी पंचायत समितीचे कार्यक्षम सदस्य राजेंद्र गदादे यांची भक्कम साथ व सकारात्मक प्रेरणा मिळाल्याने व ग्रामस्थांना ही शिक्षणाचे महत्व समजल्याने आता भरभरून मदतीचा ओघ या शाळेसाठी प्राप्त होत असल्याचे मुख्याध्यापक वाकडे यांनी सांगितले.
या शाळेस अनेक शालेय उपयोगी साहित्याची नितांत आवश्यकता होती. शालेय कामकाज करण्यासाठी शाळेतच सुविधा व्हावी हि मागणी येथील शिक्षकांनी ग्रामस्थांच्या समोर मांडली असता गुरुजींच्या या हाकेला पालकांनी तत्पर साथ दिली. यात स्थानिक नागरिक असलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन दादासाहेब गदादे यांनी शाळेला सुमारे 35 हजार रुपयांचा संगणक संच, होम थेटर, प्रिंटर ,साउंड सिस्टिम मोफत भेट दिली. यामुळे शाळेत ईलर्निग सुविधा सुरु झाली. अध्यापनाबरोबरच शाळेच्या सर्वागींण विकास व प्रगतीसाठी अहोरात्र झटत असलेले मुख्याध्यापक मानसिंग वाकडे यांच्या प्रयत्नांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सुंदर शाळा बनविने हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून काम चालू असल्याने अनेक दानशुर पालक शाळेला मदतीचा हात पुढे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
मनोहर गदादे,दत्तात्रय केदारी, नामदेव गदादे, सावता गदादे, पांडुरंग गदादे, कैलास गदादे,आरुष गदादे या ग्रामस्थांनी शाळेला रोख स्वरूपात भरीव मदत केली आहे. पालक देखील वाढदिवस,लग्न समारंभातील सत्काराचा अवास्तव खर्च टाळून शाळेसाठी आर्थिक योगदान देत आहेत.शाळेचे मुख्याध्यपक वाकडे म्हणाले कि, शाळा सर्व सुविधा युक्त असेल तर विधार्थी हा शिक्षणात रमेल. शहरात मिळणार शिक्षण आपल्या मुलांना खेड्यात,वाडी वस्तीवर मिळणं गरजेचे आहे,शाळेला गावाचा आधार असावा गावाला शाळेचा अभिमान असावा असे सांगितले.
शाळेच्या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असून लोक सहभागातून 1 लाख 59 हजार रुपयांची रोख मदत या छोट्याशा वाडीतील शाळेस झाली आहे. सध्या पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम चालू आहे. शाळा सुंदर बनविणे हे पालकांचे उद्दिष्ट आहे. शाळेतील अनेक माजी विध्यार्थी शाळेला मदत करीत आहेत.

































































