जामखेडमध्ये पोलीस ठाण्याजवळच भरदिवसा चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जामखेडमध्ये पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शहरातील मोरे वस्ती या उच्चभ्रू वसाहतीत शुक्रवारी दुपारी भरदिवसा अज्ञात चोरटय़ांनी पाठीमागील बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह एकुण दीड लाखांचा ऐवज लंपास केला. भरदिवसा पोलीस ठाण्याजवळच झालेल्या या चोरीमुळे परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शुक्रवारी सकाळी 11 वाजता तक्रारदार प्रमोद रघुनाथ जगदाळे (40, रा. मोरे वस्ती) आपल्या कुटुंबासह घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ही वेळ साधत एका अज्ञात चोरटा त्यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा उघडून घरात शिरला. घरातील लोखंडी कपाटातील 81 हजार रुपये रोख व 60 हजार रुपये किमतीचे साडेचार तोळे सोने असा एकूण 1 लाख 41 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन पाठीमागील दाराने पोबारा केला. दुपारी घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचे जगदाळे यांच्या लक्षात आले. त्यांनी ताताडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. भरदिवसा सकाळी 11 ते 1 या वेळेत ही चोरी झाल्याने या अज्ञात चोरट्याने पोलीसांना आव्हान दिले आहे, अशी चर्चा आहे. भरदिवसा पोलीस ठाण्याजवळच झालेल्या या चोरीमुळे परीसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब गव्हाणे हे करत आहेत.