ऐतिहासिक भेट सोहळ्यानंतर देव रामेश्वर मंदिरात परतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यानंतर कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू देव रामेश्वर शनिवारी रयतेच्या भेटी घेत पुन्हा आपल्या मंदिरात परतले. दर तीन वर्षांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या भेटीसाठी कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू देव रामेश्वर आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह जातो. देव रामेश्वर देवस्थान व परिसर देवालये विश्वस्त मंडळ मानकरी व ग्रामस्थ यांच्या वतीने यावर्षी भेटीचा हा सोहळा 14 व 15 फेब्रुवारी या दोन दिवशी निश्चित करण्यात आला. त्यानुसार देव रामेश्वर वारेसुत्र, तरंग व रयतेसह 14 फेब्रुवारीला वाजत-गाजत कांदळगाव येथून सिंधुदुर्ग किल्ल्याकडे रवाना झाले होते. शुक्रवारी हा भेट सोहळा संपन्न झाला. त्यांनंतर देव रामेश्वर मौनीनाथ मंदिर, मेढा मालवण येथे मुक्काम केला.

शनिवारी 15 रोजी सकाळी कुशेवाडा मेढा येथे प्रकाश कुशे यांच्या घरी कुशे कुटुंबियांना पारंपरिक भेट व आशीर्वाचन देत, सकाळी 10 वाजल्यानंतर रामेश्वर मांड बाजारपेठ येथे देव रामेश्वरचे आगमन झाले. रामेश्वर मांड मंडळातर्फे उमेश नेरुरकर यांच्या निवासस्थानी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी रामेश्वर मांड येथून देव पुन्हा रामेश्वर मंदिर कांदळगाव येथे प्रयाण केले.