
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रोत्सवाला उपस्थिती लावत देवीचे दर्शन घेतले. आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्यावतीने यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडी भराडी देवीचे दर्शन घेऊन शिवसेना शाखा येथे भेट दिली. आंगणे कुंटुंबयाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यानंतर सुमारे 22 कोटी 12 लाख खर्चाच्या मसुरे (आंगणेवाडी) लघुपाटबंधारे योजनेच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री उदय सामंत याच्याकडे सुपूर्द केले. आंगणेवाडी येथील मसुरे आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजनेच्या कोनशिलेचे अनावरणही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर यासह शिवसेना पदाधिकारी व आंगणे कुटुंबीय यांची उपस्थिती होती.

खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत करुन आंगणेवाडी यात्रेसंबंधी माहिती दिली. तसेच या परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या आणि शेतीच्या पाण्याच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुमारे 22 कोटी 12 लाख खर्चाच्या लघु पाटबंधारे योजनेच्या कामाची प्रशासकीय मान्यता केवळ आठ दिवसात दिल्याचे सांगितले. मसुरे-आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजनेमुळे मसुरे, आंगणेवाडी व देऊळवाडा गावातील लोकांना पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेचा लाभ परिसरातील गावांना होण्यासाठी 5 कोटी रुपयांचा वाढीव निधी मिळावा, अशी मागणी खासदार राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. तत्पूर्वी आंगणेवाडी येथील हेलिपॅडवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले.
































































