
राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि भाजपवर टीका केली. तसेच भाजपसोबत नीतीश कुमार यांनी केलेल्या युतीबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नथुराम गोडसेची विचारधारा असणाऱ्यांसोबत नीतीश कुमार यांनी हातमिळवणी केली आहे. मात्र, गोडसेची विचारधारा आणि महात्मा गांधी यांची विचारधारा कधीही एकत्र येऊ शकत नाही, असेही प्रशांत किशोर म्हणाले.
नीतीश कुमार यांच्याशी आपले राजकीय संबंध नव्हते. ते मला मुलगा मानत होते. मात्र, आज नीतीश कुमार गोडसेची विचारधारा मानणाऱ्या पक्षासोबत आहेत. गोडसे आणि गांधी कधीही एका दिशेने वाटचाल करू शकत नाहीत, हे वास्तव नीतीश कुमार विसरले आहेत, असेही किशोर म्हणाले. गोडसे आणि गांधी यांच्या विचारधारेसोबत तुम्ही कशी वाटचाल करणार आहात, असा सवालही किशोर यांनी उपस्थित केला आहे. तसेच आपल्या पक्षाच्या विचारधारेशी फरफट करत ते कधीपर्यंत सत्ता टिकवणार आहेत, असा सवालही त्यांनी केला आहे. नीतीश कुमार आणि भाजप यांचे संबंध नवे नाहीत. मात्र, आधीची भाजप आणि आताची भाजप याच खूप फरक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपण गोडसेच्या विचारधारेसोबत राहू शकत नसल्याचे स्पष्ट करत आपला मार्ग वेगळा असल्याचे प्रशांत किशोर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. नीतीश कुमार 15 वर्षे सत्तेचा दावा करत आहेत. मात्र, त्यांच्या कार्यकाळात बिहारचा किती विकास झाला, बिहारला विशेष दर्जा मिळाला काय, असे सवालही त्यांनी केले. बिहारमध्ये काही प्रमाणात विकास झाला आहे. मात्र, विकासाच्या मूल्यमापनासाठी असलेल्या 20 मानकांप्रमाणे बिहारची स्थिती आजही 2005 प्रमाणेच आहे. या वर्षात बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर जदयूपासून वेगळे झाल्याचे परिणाम राजकीय वर्तुळात उमटणार आहेत.


























































