
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पनवेल सत्र न्यायालयाने 14 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. प्रदिप गायकवाड असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच न्यायालयाने आरोपीला 80 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
14 फेब्रुवारी 2018 रोजी पनवेलमध्ये ही घडली होती. आरोपी प्रदिपने पिडीत मुलीचे आई वडील कामानिमित्त बाहेर गेल्याचे पाहून तिच्या घरात शिरून 14 वर्षांच्या मुलीवर बळजबरीने बलात्कार केला. याबाबत आई वडिलांना सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतरही आरोपीने पीडितेचा गैरफायदा घेत अनेकदा तिच्याशी शारीरिक संबध ठेवले. त्यातून ती गरोदर राहिली. पिडीत मुलीच्या आईला संशय आल्याने तिने मुलीची वैद्यकीय तपासणी केली. त्यात ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पिडीत मुलीने अत्याचाराची माहिती दिली. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.
या प्रकरणाची सुनावणी अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश- 2 माधुरी आनंद यांच्या न्यायालयात झाली. यावेळी शासकीय अभिव्यक्ता म्हणून अॅड. अश्विनी बांदिवडेकर पाटील यांनी काम पाहिले. सुनावणीदरम्यान एकुण 10 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात पिडीत मुलगी, पिडीत मुलीची आई, न्यायवैज्ञानिक तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी, तपासिक अमंलदार रुपाली चौधरी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यावर न्यायालयाने आरोपी प्रदिप गायकवाड याला दोषी ठरवले. आरोपीला 14 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली तसेच एकुण 80 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. दंडाच्या रकमेतील 40 हजार रुपये पिडीत मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.




























































