
दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यापासून अरविंद केजरीवाल यांनी राज्याच्या विकासाला गती देण्याचा निर्धार केला आहे. शपथविधी सोहळ्यात केंद्र सरकारच्या आशीर्वादाची अपेक्षा व्यक्त करणाऱया केजरीवाल यांनी बुधवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतली. या औपचारिक भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद बोलावली. आपले सरकार दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
केजरीवाल यांनी स्वतŠच एक ट्विट करीत अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती दिली. अमित शहा यांच्यासोबतची बैठक खूप चांगली आणि आशावादी होती. आम्ही काही मुद्दय़ांवर चर्चा केली. दिल्लीच्या विकासासाठी एकत्र काम करण्यावर दोघांचे एकमत झाले, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. त्यांनी बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास शहा यांची भेट घेतली.
शाहीन बागेवर चर्चा नाही
केजरीवाल यांनी शहा यांच्यासोबत जवळपास 20 मिनिटे चर्चा केली. या बैठकीत शाहीन बागेत सीएए, एनआरसीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर कोणतीही चर्चा झाली नाही, असे स्पष्टीकरण केजरीवाल यांनी दिले. याबाबत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.
24 फेब्रुवारीपासून विधानसभा अधिवेशन
दिल्ली विधानसभेचे तीनदिवसीय अधिवेशन येत्या 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दिल्लीकरांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी या अधिवेशनात रोडमॅप तयार केला जाईल, असे केजरीवाल यांनी या वेळी स्पष्ट केले
























































