
शेतकरी कर्जमाफी, महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरूनघोषणाबाजी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाज सुरू होताच शेतकरी कर्जमाफी तसेच महिला अत्याचारविरोधी कायद्यावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. वेलमध्ये उतरत सरकारविरोधी घोषणाबाजी करून विरोधकांनी सुरू केलेल्या गोंधळातच सभागृहाचे कामकाज पार पाडण्यात आले.
‘वंदे मातरम’ने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात झाली. अध्यक्षांनी कामकाज पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचा परिचय सभागृहाला करून दिला. यानंतर लगेचच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विजय वडेट्टीवार मागील अधिवेशनात का नव्हते याचा खुलासा करावा, अशी मागणी केली. मात्र अध्यक्षांनी पुढील कामकाज पुकारले. त्याबरोबर पुन्हा एकदा विरोधी पक्षनेत्यांनी उभे राहत स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी केली. राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारकडे नजर लावून आहेत. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, अशा परिस्थितीन स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी केली. मात्र अध्यक्षांनी ही मागणी फेटाळत कामकाज सुरू केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहा अध्यादेश सभागृहासमोर ठेवले. त्याचप्रमाणे 24 हजार 723 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहासमोर सादर केल्या. हे कामकाज सुरू असतानाच विरोधकांनी वेलमध्ये येत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शेतकऱयांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्या, महिला अत्याचारविरोधी कायदा झालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. या गेंधळातच सभागृहाचे कामकाज पार पाडण्यात आले.
विधानपरिषदेतही गदारोळ
शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या मुद्दय़ांवर विधान परिषदेत आज पहिल्याच दिवशी विरोधकांनी गदारोळ घातला. या गदारोळातच अवघ्या 13 मिनिटांत दिवसभराचे कामकाज संपले.
विधान परिषदेचे कामकाज सुरू होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार आणि मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा परिचय करून दिला, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय दौंड आणि दुष्यंत चतुर्वेदी या दोन नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दोन स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हे दोन्ही स्थगन प्रस्ताव फेटाळले. शेतकरी प्रश्नासंदर्भातील स्थगन इतर आयुधांमार्फत उपस्थित करावा अशी सूचना सभापतींनी केली, मात्र विरोधकांचे समाधान झाले नाही. विरोधकांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. या गदारोळातच 2019-20 च्या पुरवणी मागण्या आणि अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आले.




























































