पोलीस डायरी – रवी पुजारीला मोठा कुणी केला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटक पोलिसांच्या इंटेलिजन्स युनिटने मुंबईसह देशभरात खंडणीसाठी रक्तपात घडवून आणणाऱ्या निर्दयी रवी पुजारीला गेल्या आठवडय़ात हिंदुस्थानात आणले. त्याला पकडण्यासाठी पश्चिम आफ्रिकेत कर्नाटक पोलीस वर्षभर तळ ठोकून होते.

छोटा राजनवर बँकॉक येथे 2000 साली हल्ला झाल्यानंतर टोळीतून फुटलेल्या रवी सुल्या पुजारी (52) याने आपली स्वतंत्र खंडणी वसुलीसाठी टोळी सुरू केली. जेलमधून जामिनावर किंवा निर्दोष सुटलेल्या गुंडांना आपल्या टार्गेटवर फायरिंग करण्यासाठी पैसे देऊन बुक करायचे, अशी कार्यपद्धती असलेल्या रवी पुजारीने नवख्या तरुण मुलांनाही पैशाचे आमिष दाखवून गेल्या 20 वर्षांत 200 च्यावर बिल्डर, हॉटेलमालक, सिनेकलावंत, डॉक्टर, राजकारणी आदी बडय़ा व्यक्तींवर (खंडणी न दिल्यामुळे) भाडय़ाच्या शूटरकडून हल्ले घडवून आणले आहेत. त्यात काहींचे बळी गेले आहेत. विलेपार्ले येथील एकेकाळच्या बहुचर्चित ‘दीपा’ डान्सबारचा मालक व सध्याचा बांधकाम व्यावसायिक सुधाकर पुजारी याने जेव्हा रवी पुजारीच्या धमक्यांना भीक घातली नाही तेव्हा या पुजारी नावाच्या भेकडाने भाडय़ाचे शूटर पाठवून अंधेरी (प.) आंबोली येथे साईटवर असलेल्या सम्राट देवर्षी (28) व योगेश खुळे (29) या दोन निरपराध साईड इंजिनीयरना गोळ्या घालून ठार मारले. योगेशचे नुकतेच लग्न झाले होते. मालक सापडत नाही म्हणून मालकाच्या जवळच्या लोकांना धमकावणाऱ्या, त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या या शिखंडीचा वाढता आतंक पाहून मुंबई क्राईम ब्रँचचे तत्कालीन सहपोलीस आयुक्त हिमांशु रॉय आदी अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना सर्व्हिस रिव्हॉल्व्हर्स बाहेर काढण्याचे आदेश दिले. थंडावलेल्या चकमकी पुन्हा सुरू केल्या. तेव्हा बरेच गुंड मारले गेले. त्यात रवी पुजारीचा हस्तक राजेंद्र चौधरी ऊर्फ थापा याचाही समावेश होता. मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त असताना सदानंद दाते यांनीही रवी पुजारीची पाठ काढली होती. गोळीबार करणाऱ्या त्याच्या बऱ्याच शूटरना जेरबंद केले होते. त्यामुळे रवी पुजारीच्या मुंबईतील कारवायांना आळा बसला होता.

मुंबईत हादरा बसल्यानंतर रवी पुजारीने आपला मोर्चा ठाण्यात वळविला. त्यानंतर गुजरात, कर्नाटक व दिल्ली येथेही तो व्यावसायिकांना खंडणीसाठी परदेशातून धमकावू लागला. आपल्या शूटरमार्फत हॉटेल व बांधकाम व्यावसायिकांची हत्या करू लागला. रवी पुजारी हा जरी मुंबईच्या अंधेरी (प.) येथे शिकला, वाढला असला तरी तो व त्याचे आईवडील मूळचे बंगळुरूचे. त्यामुळे रवी पुजारीने बंगळुरू, मंगलोर आदी शहरांत खंडणीसाठी शूटआऊट सुरू केले. सुब्बा राजन या बडय़ा बिल्डरची हत्या केल्यानंतर रवी पुजारीचा कर्नाटक पोलिसांनी जबरदस्त धसका घेतला. छोटा राजनशी फारकत घेणाऱ्या मोहन कोटियनलाही रवी पुजारीने कर्नाटक हायवेवर गोळ्या घातल्या. तिरुपती मंदिरात दर्शनास जाण्यासाठी रवी पुजारी मोहन कोटियनच्या घरी त्याच्या पत्नीला साडीचोळी व मिठाई घेऊन गेला. घरात चहा-नाष्टा झाल्यावर आपल्या गाडीत पतीपत्नीला तिरुपतीला जाण्यासाठी बसविले आणि अर्ध्या रस्त्यातच आपला साथीदार मोहन कोटियनचा त्याने गेम केला. अशा या अत्यंत कपटी रवी पुजारीचा शोध घेण्यासाठी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटक पोलिसांचे एक पथक गेल्या वर्षी  स्थापन केले. त्या पथकाने मुंबई, कर्नाटकमधून रवी पुजारी परदेशात   भेटावयास जाणाऱ्यांवर पाळत ठेवली. रवी पुजारीच्या मुलीच्या लग्नाला परदेशात गेलेल्यांना ताब्यात घेऊन रवी पुजारीचा ठावठिकाणा ‘रॉ’ या केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने लावला व गेल्या आठवडय़ात त्यास हिंदुस्थानात आणण्यात कर्नाटक पोलिसांना यश आले. त्यामुळे कर्नाटकचे पोलीस महासंचालक श्रीमती निलायनी राजू, अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर विभाग) डॉ. अमर कुमार पांडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. तब्बल दोन दशकं अधम कृत्य करणाऱ्या व अत्यंत घातकी अशा या गुंडाला अटक केल्यामुळे व त्याला हिंदुस्थानात आणल्यामुळे शूटआऊट थांबतील अशी अपेक्षा करूया.

बनावट पासपोर्टद्वारे पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल, बुरकिना फासो, गिनी, आयवोरी कोस्ट आदी आफ्रिकन देशांत वास्तव्य करणाऱ्या रवी पुजारीने खंडणीच्या व्यवसायातून प्रचंड माया जमवली असून प्रत्येक देशात तो हॉटेल व्यावसायिक म्हणून वावरत होता. तो स्विमिंग पुल असलेल्या आलिशान बंगल्यात राहात होता. रवी पुजारी पकडला गेल्यामुळे आता गेल्या दोन दशकांतील त्याची पापं उघड होणार आहेत. त्याचे मुंबईसह देशभरातील हॉटेल व बांधकाम व्यावसायिकांबरोबर असलेले सलोख्याचे संबंधही चव्हाटय़ावर येणार आहेत. मागे खारमधील रवी पंजाबी या बिल्डरला मुंबई क्राइमने ‘मोक्का’खाली अटक केली होती. तोच आपल्या व्यवसायातील सहकाऱ्यांची खंडणीसाठी रवी पुजारीला ‘टीप’ द्यायचा. परंतु असे बरेच हॉटेल व बांधकाम व्यावसायिक रवी पुजारीच्या संपर्कात आहेत. त्यांनीच त्याला मोठा केला आहे. सीबीआयकडून कसून चौकशी झाल्यास अगदी सिनेसृष्टीतील कलावंतही एक्स्पोज होतील. रवी पुजारीला खंडणी देऊन जसा व्यावसायिकांनी त्याला मोठा केला तसाच काही पोलिसांचाही त्याला हातभार लागला आहे. म्हणूनच दाऊद, छोटा राजन, छोटा शकील मोठे झाले. रवी पुजारीपूर्वी छोटा राजन, आबू सालेम, इजाज  लकडावाला, इक्बाल कासकर आदी बऱ्याच संघटित टोळय़ांतील गुंडांना परदेशातून  अलिकडे हिंदुस्थानात ‘डिपोर्ट’ करण्यात आले आहे. परंतु दाऊद, छोटा शकील, टायगर मेमनचे काय? हे संघटित गुंड आजही सक्रिय आहेत. उलट छोटा शकील पाकिस्तानातून अधूनमधून पोलिसांना खुलेआम आव्हान देत असतो. छोटा राजन टोळीतून फुटून निघालेल्या व खंडणीवसुलीसाठी स्वतःची स्वतंत्र टोळी स्थापन करणाऱ्या इजाज लकडावाला यास मुंबई क्राइम बॅचने अलीकडे अटक केली आहे. तो म्हणतो, ‘आम्ही पाकिस्तानात दाऊदला ठार मारण्यासाठी दर्ग्याबाहेर फिल्डिंग लावली होती; परंतु त्याला नेपाळच्या मिर्झा बेग या मंत्र्याने टीप दिल्याने दाऊद वाचला. नमाज पडायला दर्ग्यात गेलाच नाही.’ तेव्हा केंद्रीय गुप्तचर यंत्रणा गुन्हेगारांची, अतिरेक्यांची माहिती मिळविण्यासाठी अंडरवर्ल्डचीही मदत घेतात; परंतु रवी पुजारी असो अथवा इजाज लकडावाला असो, खबरे त्याचा गैरफायदा घेतात हे विसरून चालणार नाही. छोटा राजनचा वापर ‘रॉ’ने केल्यामुळेच दाऊदचे बरेचसे गुंड मारले गेले. दाऊद टोळीचे कंबरडे मोडले. त्यामुळेच छोटा शकीलने छोटा राजनवर बँकॉकमध्ये प्राणघातक हल्ला केला. परंतु छोटा राजन वाचला. तर त्याचा साथीदार रोहित वर्मा ठार झाला. पोलिसांना खबर देण्यावरूनच एकेकाळी गँगवॉर वाढले होते. मुंबई पोलिसांनी गुंडांची मदत घेऊन म्हणजे काटय़ाने काटा काढूनच गँगवॉर संपविले हे आताच्या नव्या अधिकाऱ्यांनी विसरू नये. गँगवॉर वाढले. मुंबईत रक्तपात सुरू होता. तेव्हा मुंबईत पोस्टिंग घेण्याची कुणा आयपीएस अधिकाऱ्यांची हिंमत होत नव्हती. कागदी वाघ तेव्हा गुहेत बसले होते. गँगवॉर संपल्यावर व बॉम्बस्फोट थांबल्यावर आता कागदी वाघ बाहेर आले आहेत. त्यांनी मागचे दिवस विसरू नयेत आणि आपल्याच खात्यातील अधिकाऱ्यांचे वस्त्रहरण करू नये.