साकीनाक्यात नारळांच्या सहा झाडांवर विषप्रयोग; मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साकीनाका परिसरात कंपनीच्या आवारात असलेल्या नारळाच्या 6 झाडांवर विषप्रयोग करण्यात आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक आणि वृक्षप्रेमींकडून करण्यात येत आहे. पालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकाने याबाबत पाठपुरावा केल्यानंतर याविरोधात पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

साकीनाका परिसरात असणाऱया ग्लो मेटल कंपनीच्या आवारात नारळाची 6 झाडे आहेत. मात्र, उंच आणि मजबूत घेर असलेल्या या झाडांच्या बुंध्यात 8 ते 9 इंच मोठे छिद्र करून त्यातून विषारी इंजेक्शने देण्यात आली आहेत. इंजेक्शनमुळे ही झाडे सुकली आहेत. महाराष्ट्र नागरी क्षेत्र संरक्षण आणि जतन अधिनियमानुसार, वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय झाडे तोडणे किंवा झाडाला हानी पोहचेल हा गुन्हा आहे. त्यात अशा प्रकारे अमानवी कृत्य करणाऱयांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी स्थानिकांसह वृक्षप्रेमींकडून करण्यात येत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहेच, पण त्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी जागामालकावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि न्यायालयानेही याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक वाजीद कुरेशी यांनी केली आहे.