
देवाने माणसाची निर्मिती गोष्ट सांगण्यासाठी केली. प्रत्येक माणूस म्हणजे एक गोष्ट आहे. त्यामुळे जितक्या जास्त भाषा तुम्ही शिकाल तितक्या त्या भाषेतील गोष्टी तुम्हाला कळतील, माणसे कळतील. कोणतीही नवीन भाषा शिकणे ही आनंददायी गोष्ट आहे. मातृभाषेसह माणसाने दोनपेक्षा जास्त भाषा शिकल्या पाहिजेत, असे प्रतिपादन कवी-अभिनेता किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र यांनी केले. जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंबई महानगरपालिकेत मराठी भाषा दिन आणि संवर्धन पंधरवडय़ाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कवी सौमित्र यांनी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज तसेच स्वतःच्या काही कविता सादर करत कार्यक्रम रंगतदार बनवला. आई हे विद्यापीठ असते. कुठेही गेले तरी आईची भावना तीच असते. प्रत्येक भाषा ही विद्यापीठच असते. हे विद्यापीठ तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करते, असे गौरवोद्गार कवी सौमित्र यांनी काढले. आईची तुलना कोणाशीही करता येणार नाही. मराठी भाषेला आईसारखेच जपले पाहिजे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. यावेळी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी मुंबईतील दुकानांचे आणि मुंबईतील अमेरिकन कॉन्सुलेटचे फलक मराठीत लावण्याची सक्ती करावी. पालिका आयुक्तांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा अशी सूचना केली.

































































