
>> डॉ. दिलीप धानके
आपल्या बळीराज्य कृषी संस्कृतीत गाय व इतर पशुधनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. कृषी संस्कृतीत भूमाता आणि गोमाता नेहमीच शेतकऱयाला उपयुक्त ठरत आली आहे. समृद्ध हिंदुस्थानची कृषी संस्कृती म्हणजेच गो- संस्कृती आहे.
विषमुक्त नैसर्गिक शेतीचा मूळ पाया ही आपली देशी गावरानी गायच आहे हे आता अधोरेखित झाले आहे. हिंदुस्थानी कृषीरथाची गाय व बैल ही दोन चाके आहेत. जगात कितीही हरितक्रांत्या झाल्या व कृषी संशोधनाच्या कितीही आवृत्या आल्या तरी ही कृषीरथाची दोन चाकी चौकट कोणीही कधीही मोडू शकणार नाही. देशी अथवा गावठी गाईला हिंदुस्थानी जीवनात जे मातेचे स्थान देण्यात आले आहे ते स्वयंसिद्ध स्थान आहे. कुटुंबात आईचे जे मेरुदंडाचे स्थान आहे, जे प्रमुख स्थान आहे तेच शेतीत गायीचे स्थान आहे. हे स्थान कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. म्हणूनच गाईला गोमाता म्हटले जाते.
महाराष्ट्रात तर मुलीचे लग्न झाल्यानंतर तिला सासरी पाठवताना तिच्यासोबत एक दुभती देशी गाय कन्यादान स्वरूपात भेट देण्याची परपंरा अनेक वर्ष सुरू होती. आजही काही कुणबी शेतकरी ती पद्धत पाळतात. तसेच सणाला व आनंदाच्या क्षणी घरोघरी तुपाचे दिवे लावले जात असत. याच कल्पवृक्ष कामधेनू गाईचे महत्त्व आजच्या तांत्रिक-मांत्रिक युगात शून्यावर आले आहे म्हणून देशी गाईवर आधारलेली शेती आज शेवटच्या घटका मोजत आहे. देशी गाय आजसुद्धा एक उपयुक्त प्राणी आहे. घरोघरी एक तरी देशी गाय असलीच पाहिजे. तरच पुन्हा एकदा कृषीक्रांतीला एक नवी दिशा प्राप्त होईल.
गाईमध्ये कमी चारा, कमी व्यवस्थापन व विपरीत हवामानातही अधिक दूध, शेण, मूत्र, जिवाणू व जास्त शक्तिसंपन्न बैल देण्याची अभूतपूर्व क्षमता असते. परदेशी संकरित जर्सी व हॉस्टिन फ्रिजियन ही गाय हिंदुस्थानात स्थिरावली आणि आपली मूळची देशी गावरानी गाय दुर्लक्षित झाली. बाहेरची पाहुणी आली आणि घरची नावडती झाली, पण बाहेरच्या देशात मात्र हिंदुस्थानी देशी गोवंशाच्या संवर्धनाची लाट येत असल्याचे दिसून येते. केवढा हा दैवदुर्विलास! संपूर्ण दक्षिणपूर्व आशिया व आफ्रिकेत हिंदुस्थानी देशी गोवंश संवर्धनाची व पालनाची एक मानसिकता तयार झाली असून आपल्या गाई तिथे मोठय़ा प्रमाणात पाळताना दिसतात. ब्राझील देशात गीर जातीची फार मोठी मागणी आहे. गोरस (दूध), गोमय (शेण), गोअर्क (गोमूत्र) ही त्रिस्तरीय गोसंजीवनी आजही तेवढीच गुणकारी ठरत आहे आणि ते वैज्ञानिकदृष्टय़ा परिपूर्ण सिद्ध झाले आहे.
गोरस (दूध) – गाईचे दूध आयुर्वेदात श्रेष्ठतम संपूर्ण आहार आहे. गाईचे दूध पौष्टिक, सात्त्विक व स्वादिष्ट आहे. गाईच्या दूध, दही व तुपामध्ये कॅन्सरसारख्या दुर्धर प्राणघातक रोगांना रोखण्याची प्रतिरोधक क्षमता असते. जीवनसत्त्व ‘अ’(कॅरोटिन)हे फक्त गाईच्या दुधात व केसिन हे फक्त गाईच्या तुपात असते. शरीराचे कुपोषण, डोळ्यांचे विकार रोज गाईचे दूध प्याल्याने नष्ट होतात. देशी गाईच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा दहापट अधिक जीवनसत्त्वे, कॅरोटिन्स, सूक्ष्म खनिज क्षार, उत्कृष्ट प्रतीची प्रथिने, उपयुक्त शर्करा, अमिनो आम्ले असतात. त्यामुळे गायीचे दूध त्वरित पचन होणारे, भूक वाढविणारे, शक्तिवर्धक व बुद्धिवर्धक गुणधर्माचे आहे. देशी गाईचे हेच दूध आजकाल ए2 मिल्क म्हणून ओळखले जाऊन ब्रॅन्ड झाले आहे.
देशी गाईच्या शेणाचे औषधी गुणधर्म – देशी गाईच्या एक ग्रॅम शेणात 63 कोटी ते 300कोटी जिवाणू असतात. म्हणूनच गोमय वसते लक्ष्मी! गाईच्या शेणापासून शेणखत तयार होते. याच शेणखतातून सेंद्रिय विषमुक्त अन्नधान्य, भाजीपाला,फळे तयार करता येतात. आज बाजारपेठेत विषमुक्त भाजीपाल्याला अधिक किंमत मिळते. एका देशी गाईपासून 30 एकर शेती पिकवता येते हे कृषिऋषी सुभाष पाळेकर तंत्राने शक्य झाले आहे. आज महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर आंध्र प्रदेशात देशी गाईवर आधारित झीरो बजेट नैसर्गिक शेती करतात. गाईच्या शेणामधून 33 प्रकारची अन्नद्रव्ये उपलब्ध करणारे उपयुक्त कोटय़वधी जिवाणू शेण आणि गोमूत्राच्या माध्यमातून शेतकऱयाला मिळतात. एक देशी गाय साधारणपणे 25वर्षे जगते. दररोज दहा किलो शेण देते. एक गाय पंधरा ते वीस वासरांना जन्म देते. देशी गाईच्या शेणामूत्रावर प्रक्रिया करून गोमूत्र अर्क, शेणापासून धुपकांडी, अगरबत्त्या, साबण असे नानाविध प्रकार तयार होतात. तसेच गाईच्या शेणाच्या गोवऱया यज्ञ, होम, पूजेसाठी विकल्या जातात. देशी गाईच्या दुधाला लिटरला 90 रुपयांचा दर मिळतो. देशी गाईच्या एक किलो शेणापासून एक किलो गॅस तयार होतो.
गोमूत्र – गोमूत्र शिंपडले की, वातावरण शुद्ध होते. गोमूत्र सर्वोत्कृष्ट जंतुनाशक आहे, बुरशीनाशक आहे, रोगनाशक आहे. कीडनाशक आहे. गोमूत्र कानात टाकल्याने कानाचे सर्वच विकार दूर होतात. पहाटे उठल्याबरोबर बरेच लोक गोमुत्राची गुळणी करतात. म्हणून अनेक दुर्धर रोगांचा नाश करणारे गोमूत्र अर्क बाजारात आयुर्वेदिक औषधे म्हणून विकले जाते. देशी गाईच्या गोमूत्रापासून विषमुक्त शेतीसाठी जिवामृत बनविले जाते. या जिवामृताच्या फवारणीने पिके बहरतात हे सप्रमाण सिद्ध झाले आहे.
अनेक व्याधींवर अतिशय जालीम क्रांतिकारक उपाय म्हणून देशी गाईच्या तुपाला अधिक महत्त्व आहे. शिवकाळात जखमा लवकर बरे करण्यासाठी देशी गाईचेच तूप वापरले जात होते याची साक्ष म्हणजे आजही किल्ले पन्हाळगडाजवळ एक तुपाची विहीर असल्याची नोंद आहे. तुपामुळे तलवारीचेसुद्धा घाव भरले गेले होते. खिल्लार, डांगी, देवणी, थारपारकर, साहीवाल, गीर, लालकंधारी, कांकरेज, कोकण गिड्डा, गवळाऊ, राठी या काही देशी जाती आहेत. या व इतर स्थानिक देशी गावरान गाईंचे संवर्धन व गोपालनाची चळवळ आता वाढीस लागली पाहिजे. गावोगावी देशी गाईंची नोंदणी करून सामूहिक देशी काऊ क्लब (ण्दै ण्त्ल्ं) स्थापन होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर व तालुका पातळीवर सामाजिक संस्था व गोरक्षक दलांनी पुढे यायला हवे. देशी गोपालकांना प्रेरित करण्यासाठी गोशाळा प्रकल्प, चारा खाद्य खुराक अनुदानासारखे प्रयोग यशस्वी व्हायला पाहिजेत. स्थानिक पातळीवर देशी गाय पालक शेतकरी समूह गट तयार करून देशी गाय चळवळ कार्यक्रम हाती घेतला तर देशी गाय हीच कृषी संस्कृतीची एक कामधेनू संजीवनी कल्पवृक्ष ठरेल.
(लेखक ठाणे जिल्हा परिषदेत सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत)




























































