सजग… संवेदनशील…स्फोटक लेखणी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अशोक समेळ

कवयित्री डॉ. सोनाली लोहार. पेशाने आवाजाच्या डॉक्टर. सजग वैद्यकीय ज्ञानाबरोबरच त्यांची लेखणीही प्रखर सामाजिक जाणिवेने पेटून उठते आणि परखड शब्द आसुड होऊन कागदावर उमटू लागतात.

प्रत्येक कलाकाराचं शस्त्र आणि अस्त्र आहे तो त्याचा आवाज. ज्याला आपला आवाज बाल्कनीच्या शेवटच्या खुर्चीपर्यंत पोहोचवता येतो तो अभिनेता, असे डॉ. काशीनाथ घाणेकरांचं मत होतं आणि त्या मताशी आमची पिढी ‘शंभर टक्के’ सहमत होती. कलाकारही सहमत होते. तो अभिनयही नाटकाच्या बाजाप्रमाणेच सहज होता. आज अनेक मोठमोठे कलाकार ‘सहज’ अधिक सहज अभिनय करण्यासाठी तांत्रिक लॅपलचा उपयोग करतात… पण तो आवाज लावणं नव्हे. पंडित भीमसेन जोशी किंवा गानसरस्वती किशोरी आमोणकर हे महान तपस्वी कलाकार गाण्यासाठी आवाज लावायचे. लॅपलमाईक नाही!हे सांगण्याचं कारण एवढंच की, गेली 50 वर्षे नाटकात काम करून आजही आवाज लावायची सवय होती. पण 2015 पासून मी आणि पत्नी संजीवनी, आम्ही माझ्याच कादंबरीचं ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’चं अभिवाचन करायचो. ते महाभारतकालीन प्रत्येक व्यक्तिरेखेचा साज आणि बाज राखून… त्यामुळे महाभारतातली प्रत्येक व्यक्तिरेखा ही जिवंत होऊन समोर उभी राहायची. एकूण 115 प्रयोग केले त्याचे, पण 70 प्रयोगानंतर माझा आवाज बसला. बसत चालला होता तरी, मी प्रयोग रेटत होतो.

संजीवनीने एक दिवस ‘व्हॉईस थेरेपिस्ट’ डॉ. सोनाली लोहार यांचं भाषण प्रात्यक्षिकांसह ऐकलं… आणि मला सांगितलं. तिने त्यांची त्यांच्या क्लिनिकवर माझी भेट ठरवली. त्याप्रमाणे माझ्या डॅमेज झालेल्या आवाजानं मी त्यांना भेटायला गेलो. मी आलो म्हटल्यावर डॉ. सोनाली लोहार स्वतः मला लगेच भेटल्या आणि त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेल्या. विलक्षण आकर्षक व्यक्तिमत्त्व, सुंदर उंची, सुंदर डोळे, सुंदर हसणं आणि प्रत्येक कलाकाराविषयी वाटणारी आस्था हेही त्याच्या व्यक्तिमत्त्वातलं कवित्व प्रचंड उत्साहवर्धक होते. त्यांनी त्यांचे सीनियर डॉ. भूमकर यांना माझा घसा दाखवला. मला घशाचा कॅन्सर नाही… हे कळल्यामुळे सुस्कारा सोडला आणि मी डॉ. सोनालीचा पेशन्ट झालो. पहिला तिने दम दिला, गुळण्या, घशातली खा खू अजिबात करायची नाही. काही घशाचे व्यायाम दिले आहेत. फक्त गरम पाण्याचा वाफारा घ्यायला सांगितला. हे मी गेले तीन वर्षे इमानेइतबारे करतोय. कार्यक्रम चालू आहेत. तीन-तीन तास व्याख्यानेही देतो. आवाजाला साधा चरोटा नाही. थँक्स सोनाली! आधी ही घसा खडखडून त्याला मधुरता प्राप्त करून देणारी डॉक्टर एक उत्तम लेखिका आणि कवयित्री असेल याचा साक्षात्कार मला फेसबुकद्वारे झाला! बरं डॉक्टरांच्या कविता सामान्य नाहीत तर विलक्षण सर्जनशील आहेत! निर्भया बलात्काराचे फाशीचे नराधम अजून कायद्याचे दरिद्री खेळ खेळतायत… पण सोनालीची कविता आजही आपलं हृदय पोखरते! डॉ. सोनाली म्हणते…

कोवळी मी, सावळी मी, नवथर मी, अल्लड मी,
कोसळणाऱया नभातील, लखलखती वीज मी!
मी रती, मी मेनका, मीच आभा, मी प्रभा,
मोगऱयाच्या रात्रीचा, घमघमता श्वास मी!
जननी मी, आदी मी, शक्ती मी, अन् युक्ती मी
ब्रह्माच्या नाभीतून, उमलले ते कमल मी।
अश्रू मी, अंगार मी, मी जानकी, मी द्रौपदी
सहस्रे मरणे जगून उरली- निर्भया मी… अक्षया मी।।

ही कविता आपल्या सर्वांनाच विलक्षण अंतर्मुख करते. आज एकूणच स्त्र्ायांवरील अत्याचाराचं… बलात्काराचं स्वरूप पाहता पुरुषी अहंकार वाढलाय. तो पार 8000 पूर्वी रामायणापासून व 6000 वर्षांपूर्वी महाभारतापासून. तोच कायम राहणार आहे? आमची आई, पत्नी, बहीण, वहिनी सुरक्षित आहे? सुरक्षित राहणार आहेत?2007 साली मी नाटक लिहिलं होतं… अरुणा शानभाग, वय 25वर्षे, केईएम हॉस्पिटलच्या नर्सवर एका वॉर्डबॉयने नराधम सोहनलाल वाल्मीकीने 26 नोव्हेंबर 1973 साली बलात्कार केला होता… त्याची स्टेटमेंट काय होती. पैर की जुती पैर में रहनी चाहिए। अरुणा जवळजवळ 60/65 वर्षांची होईपर्यंत कोमात होती. जवळजवळ 40 वर्षे… कारण काय? तिने तो चोऱया करतो म्हणून त्या वॉर्डबॉयची वरिष्ठ डॉक्टरना तक्रार केली! आम्हा स्त्र्ायांना बरोबरीचे कधी समजणार – त्यावर डॉ. सोनाली तिरमिरीने म्हणते…

माझ्या पोरीला… ओरडून झालं, किंचाळून झालं,
वाचून झालं, लिहूनही झालं, दोन पायातल्या जागेला
शंभर डोळय़ांनी ओरबाडून झालं… सगळं काही सुरूच आहे
काहीच कुठे संपेना… प्रश्न माझा साधाच आहे
पण उत्तर कोणीच देईना… माझ्या पोरीला बाहेर पाठवू की नको?
कोवळा जीव कुस्करला गेला, निर्लज्ज राजकारण करून झालं…
मेलेल्या मढय़ावरचं लोणी, चाटून पुसून ओरपूनही झालं…
मेणबत्त्या पेटल्या आणि विझल्या
त्या मेणचट धुराला आता स्मशानाचा वास आहे…
तो वास छातीत भरून घ्या
आणि मला सांगा, माझ्या पोरीला बाहेर पाठवू की नको?
फाटलेल्या योनीच्या चिंध्या आणि तडफडणाऱया स्त्रित्वाची लक्तरं जगाच्या वेशीवर टांगूनही झाली तरी माणूस संपवू नका…
मात्र एका प्रश्नाचं उत्तर द्या…माझ्या पोरीला बाहेर पाठवू की नको??

आहे कुणाकडे या प्रश्नाचं उत्तर? राजकारणी ते समाजकारणी, थोर विचारवंत… अशा बलात्कारांच्या घटनेचे व्हिडीओ बनवणारे हौशी, मौशी, मीडिया? आहे तुमच्याकडे या प्रश्नाचं उत्तर? आमची अग्निशिखा डॉ. सोनाली लोहार विचारतेय, आहे तुमच्याकडे उत्तर? सगळा समाज भेकड, नामर्द वाटतो. अशावेळी मग हतबल होऊन आपण एकच प्रश्न स्वतःला विचारतो कशासाठी जगतोय आपण? का जगतोय? हे सर्व कधी थांबणार आहे? स्त्र्ााr ‘माता’ आहे, हे आपण कधी लक्षात घेणार आहोत? सोनाली, तू तुझे कर्म कर. तुझे प्रश्न आम्हाला विचारतच जा… आपण सकारात्मक आत्मे आहोत… मार्ग सापडेल…!

अशा कितीतरी कवितांतून डॉ. सोनालीचा हसरा, सोज्वळ, सात्विक चेहरा वेगवेगळय़ा विषयावर आक्रंदत असतो… इतर स्त्र्ायांचाही आक्रंदतो, पण बायांनो रडू नका या नराधमाना शिक्षा द्या… कायमची! सोनालीकडे विषयांचं भांडार आहे. कौतुक हेच आहे की घसा तपासताना हिला अंतरात्म्याचे दर्शन कधी होते? आता तिची केसरीया कविता बघा…

‘‘प्रेमाचं नं भारीच असतं, ते एक तर असतं किंवा अजिबात नसतं…
याच्यावर पावशेर आणि त्याच्यावर मणभर असं तर मुळीच नसतं…
काही सल, काही आठवणीच्या गाठी…
त्या नाही येत सोडवता, म्हणूनच ते सारं जपायचं असतं…
आयुष्य केशरी करायला मित्रा,
त्या आठवीत ‘तुझं माझं असणं’ इतकंही कारण पुरेसं असतं…!
वा… सोनाली! किती सुंदर आहे हे नातं! ते जपण्यात आणि जगण्यात मजा आहे… आता तुझ्याच शब्दांत शेवटचं काव्य
अनावर कोसळणं सारखंच… पावसाचं आणि प्रेमाचं…
दाटून येणं सारखंच अश्रूचं आणि अंधाराचं…
लंपडाव सारखाच, साथ आणि सावलीचा…
कधी भरावा मळवट, काजळ भरल्या रात्रीचाही…
इवलंस का होईना, पण जगावं कधीतरी…
भानावर असणं म्हणजेच जगणं नाही…।।
डॉ. सोनाली… तू लिही… लिहीत रहा…
एक संध्याकाळ जेव्हा काळोखाची जोडवी वाजवत,
ओसरीतून माजघरात शिरेल,
तेव्हा तू लिही… आणि जेव्हा शून्याचाही सूर्य होईल तेव्हा तू लिही… सोनाली, तेव्हा तू लिही।।
लिहीत रहा।।

[email protected]