
नागपूरचे प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर हे नवनविन विक्रमासाठी प्रसिध्द आहे. गुरुवारी त्यांनी श्री साई भक्त, साई सेवक परिवार विदर्भ व साई पालखी परिवारच्या माध्यमातून श्री साई बाबांच्या प्रसादासाठी 1400 किलोची खिचडी करुन साई भक्तांना प्रसाद म्हणून वाटली.
साई बाबा मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या पटांगणात साई भक्तांनी गुरुवारी सकाळी 6 वाजे पासूनच गर्दी केली होती. विष्णू मनोहर आपल्या सहकाऱ्यांसोबत मैदानात हजर होते. 500 किलो साबुदाणा, 100 किलो शेगंदाण्याचा कुट, 150 किलो बटाटे, 50 किलो जिरे, 50 किलो हिरवी मिरची, 10 किलो साखर आणि 10 किलो मिठ व इतर तत्सम साहित्य हे सर्व मिश्रीत करुण खिचडीला सकाळी सहा वाजता सुरवात केली. तब्बल साडेतीन तासांनी ही खिचडी पूर्ण झाली.
श्री साई बाबांना खिचडीचा नैवद्य दाखविल्या नंतर साई भक्तांना या प्रसादाचे वाटप करण्यात आले. या प्रसादाकरिता हजारो साई भक्तांनी परिसरात रांग लावली होती. दुपारी 2 वाजेपर्यंत 1400 किलो खिचडीचे वाटप करण्यात आले.
दरवर्षी नवनविन उपक्रम करुन नागपूरकरांचे लक्ष वेधणारे विष्णू मनोहर यांनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा खोवला आहे. या उपक्रमासाठी राजीव जयस्वाल, मिलींद देशकर, विजय जते व राधा सहस्त्रभोजने यांनी सहकार्य केले.






























































