ओबीसींसाठी 72, धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी 12 वसतिगृहे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलांसाठी एक व मुलींसाठी एक अशी एकूण 72 वसतिगृहे सुरू करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे धनगर समाजासाठी 12 वसतिगृहे सुरू करण्याबाबत बहुजन कल्याण विभागाने पावले उचलली आहेत. याविषयी नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सकारात्मक भूमिका मांडली.

बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या दालनात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीला ओबीसी समाजाचे विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच माजी आमदार प्रकाश शेंडगे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 7200 ओबीसी विद्यार्थ्यांची सोय होईल अशी वसतिगृहे सुरू करण्यात यावीत अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली. यावर विजय वडेट्टीवार यांनी भाडेतत्वावरील इमारतीत वसतिगृह सुरू करण्यास सकारात्मकता दर्शविली. धनगर समाजाच्या 2400 विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील सहा विभागांत 200 मुलांसाठी 1 व 200 मुलींसाठी 1 अशी एकूण 12 वसतिगृहे भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू करण्यात येणार आहेत. अन्य समाजांप्रमाणेच ओबीसी समाजाच्या फीची 100 टक्के प्रतिपूर्ती करण्यात येईल असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. या बैठकीसाठी राज्यमंत्री दत्ता भरणे व पाच विभागांचे प्रधान सचिव, आमदार हरिभाऊ राठोड ओबीसी नेते चंद्रकांत बावकर, हरिभाऊ शेळके, जेडी तांडेल, युनूस मणियार आदी उपस्थित होते.

बारा बलुतेदारांचे आर्थिक विकास महामंडळ
बारा बलुतेदारांचे पारंपरिक व्यवसाय बंद पडल्यामुळे त्यांची दयनीय अवस्था झालेली असल्यामुळे त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजासाठी वेगळे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी प्रकाश आण्णा शेंडगे व सर्व ओबीसी नेत्यांनी केली. त्यावर मंत्रिमहोदयांनी सर्व ओबीसी नेत्यांची व्यापक बैठक लककरच बोलून योग्य तो निर्णय बारा बलुतेदारांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतला जाईल असे आश्वासन दिले.